Pakistan: पंतप्रधान Imran Khan यांना कोरोना विषाणूची लागण; घेतला आहे कोरोना लसीचा पहिला डोस
इम्रान खान (Photo Credits: Instagram)

इतर देशांप्रमाणे पाकिस्तानही (Pakistan) कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या पाकिस्तानमध्येही कोरोना लसीकरण जोरदार सुरु आहे. अशात बातमी मिळत आहे की पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (PM Imran Khan) यांना कोरोनाची लागण झाली आहे. याआधी खान यांना कोविड-19 लसचा पहिला डोस देण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पाकिस्ताचे पंतप्रधान सध्या घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माहिती दिली. महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानचे 68 वर्षीय पंतप्रधान हे कधी काळी अव्वल एथलीट आणि क्रीडापटू राहिले आहेत.

पंतप्रधान इम्रान खान हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचारी आणि त्यांची भेट घेणार्‍या लोकांची चाचणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच इम्रान खान यांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. पंतप्रधान इम्रान यांनी चीनमध्ये तयार केलेली कोरोना लस घेतली होती. सध्या त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

चीनकडून मिळालेल्या लसीच्या डोसमुळे इम्रान खान सरकारचा लसीकरण कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. वस्तुतः चीनकडून तीन हप्त्यांमध्ये मिळालेल्या बहुतेक लसी डोस सरकारी, सैन्य, मोठे व्यापारी आणि राजकीय पक्षात असलेल्या लोकांना देण्यात आले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांना मर्यादित प्रमाणात लस मिळू शकली आहे. हेच कारण आहे की पाकिस्तानमध्ये अद्याप कोरोना विषाणूची गती वेगाने वाढत आहे. इम्रान सरकारच्या दुर्लक्षामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत लोकांमध्ये जनजागृती होत नाही. लोक दररोज बाजार आणि मशिदींमध्ये मोठ्या संख्येने जमा होत आहेत. या दरम्यान, सामाजिक अंतर आणि मास्कचे नियम डावलले जात आहेत. (हेही वाचा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden विमानात चढताना घसरले (Watch Video)

पंजाब प्रांताचे आरोग्यमंत्री यास्मीन रशीद म्हणाले की, गुजरात, सियालकोट आणि हाफियाबादमध्ये लॉकडाऊन लादण्यात आले आहे. नियोजनमंत्री आणि राष्ट्रीय कमांड अँड कंट्रोल सेंटर फॉर एपिडिमिक्सचे प्रमुख असद उमर यांनी इशारा दिला की, मानक कार्यपद्धतींचे पालन न केल्यास निर्बंध आणखी कठोर केले जाऊ शकतात. चीनमधून पाठविलेल्या 'सिनोफर्म' लसीची एक खेप बुधवारी पाकिस्तानमध्ये दाखल झाली.