धक्कादायक! Live Show दरम्यान PTI नेत्याची पत्रकाराला जमिनीवर पाडून मारहाण, Video Viral
Live Show दरम्यान PTI नेते आणि पत्रकारामध्ये मारामारी (संग्रहित-संपादित प्रतिमा)

काही दिवसांपूर्वी देशात एका वृत्तवाहिनीच्या मुलाखातीदरम्यान भाजप आणि कॉंग्रेस प्रवक्ते यांमध्ये चांगलीच जुंपली होती. आता पाकिस्तानच्या (Pakistan) वृत्तवाहिनीच्या लाइव्ह शो दरम्यान चक्क हाणामारी घडल्याच्या प्रकार समोर आला आहे. सत्ताधारी पक्ष पीटीआय (PTI) च्या एका नेत्याने पॅनेल मध्ये समाविष्ट असलेल्या वरिष्ठ पत्रकारांना बुक्क्यांनी मारहाण केली आहे. ‘के 21 न्यूज’ या वाहिनीवर हा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

'के 21 न्यूज' या वाहिनीवर ‘न्यूज लाइन विथ आफताब मुघेरी’ हा शो चालू होता. शोमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये चांगलाच वादविवाद सुरु होता. या शोमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पार्टीचे मंसूर अली सियाल (Masroor Ali Siyal) हे घमासाम चर्चा करीत होते. त्यांच्यासोबत पॅनेलमध्ये कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष इम्तियाज खान देखील सहभागी होते. दोघांमध्ये शाब्दिक चकमक चालू होती. इम्तियाज खान ज्या पद्धतीने आपली बाजू मांडत होते ते सहन न झाल्याने, मंसूर अली सियाल यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी इम्तियाज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

लाइव्ह शो दरम्यान असा अपमान होत असलेला पाहून, इम्तियाज यांनीही मंसूर यांना धक्काबुक्की केली. या मारहाणी दरम्यान इतर पाहुणे आणि अँकर यांनी मध्यस्थी करत हे भांडण प्रयत्न केला. अखेर दोघे शांत झाल्यावर पुन्हा मंसूर अली सियाल आपल्या जागेवर येऊन बसले, इम्तियाज हेदेखील खुर्चीवर बसले आणि पुढच्या चर्चेला सुरुवात झाली.