पाकिस्तान विकत घेणार भंगारात असलेली विमाने; इजिप्तने टाकून दिलेल्या 36 मिराज-V जेटसाठी बोलणी सुरु
इम्रान खान (संग्रहित संपादित प्रतिमा)

नुकतेच भारताने अमेरिकेकडून 'अपाची' (Apache) हे अत्याधुनिक पद्धतीचे लढाऊ हेलिकॉप्टर विकत घेतले. यामुळे आता शत्रूवर मात करण्यासाठी हवाई दलाची ताकद अधिक मजूबत होणार आहे. अपाचे विमानांसोबतच भारतीय वायुसेनेने राफेल विमानेही सामील होणार आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) इजिप्तकडून (Egypt) 36 डॅसॉल्ट मिराज-व्ही (Mirage V) फायटर विमान खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करीत आहे. विशेष म्हणजे फ्रेंच कंपनी डसॉल्टने स्वत: ही फायटर जेट बनविणे बंद केले आहे. एवढेच नव्हे तर इजिप्तने आपल्या हवाई दलातूनही मिराज-व्ही जेटला सेवानिवृत्त केले आहे. परंतु तरीही पाकिस्तान आपल्या हवाई दलासाठी हे विमान खरेदी करण्यास तयार आहे.

मिराज-V जेट भारताकडे असलेल्या मिराज-2000 च्या समोर अजिबात टिकू शकणार नाही. मिराज-2000 याच लढाऊ विमानातून भारतीय हवाई दलाने फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. पाकिस्तानकडे आधीपासूनच 91 मिराज-V फायटर जेट आणि 87 मिराज-III फायटर जेट आहेत. याशिवाय त्याच्याकडे एफ-16 फायटर फाल्कन जेटसुद्धा आहेत. त्यातील एकाला 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय वायुसेनेच्या मिग-21 बायसन सैनिकाने उडवून लावले होते. (हेही वाचा: पाकिस्तानचे नापाक कृत्य; जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरची तुरुंगातून छुप्या रीतीने सुटका, भारताविरुद्ध कट रचण्याची योजना)

आता पाकिस्तान आपल्या हवाई दलाच्या मजबुतीसाठी इजिप्तकडून त्यांनी भंगारात काढलेली जेट विकत घेत आहे. पाकिस्तानला या फायटर विमानांमध्ये सुधारणा करुन पुन्हा लढण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. रोझ प्रोजेक्टतंर्गत पाकिस्तान त्यांच्याकडे असलेल्या मिराज-३ आणि मिराज-V विमानेदेखील अपग्रेड करत आहे.