पाकिस्तान: बलूचिस्तान येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये 3 दहशतवाद्यांकडून हल्ला, एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-File Photo)

पाकिस्तान (Pakisatan) येथील एका पंचतारांकिच हॉटेलमध्ये 3 दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील बलूचिस्तान मध्ये ग्वादर येथील हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पर्ल कॉन्टिनेंटल (Pearl Continental Hotel) असे या पंचतारांकित हॉटेलचे नाव आहे. तर दहशतवाद्यांकडून सातत्याने गोळीबार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाल्याचे माहिती देण्यात आली आहे.

तर हॉटेलमध्ये थांबलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र दहशतवाद्यांनी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर हल्ला केला असून त्यांना प्रतिउत्तर दिले जात आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून आजूबाजूचा परिसरात नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली.

यापूर्वी 19 एप्रिलला 2019 रोजी ग्वादर येथीलच ओरमारा परिसरात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात नेव्ही, हवाई दल आणि कोस्टगार्डचे 11 जवानांसह 14 लोकांची हत्या करण्यात आली होती. येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट, बलुचिस्तान रिपब्लिक आर्मी आणि बलुचिस्तान रिपब्लिकन गार्ड यांनी स्विकारली होती.