Nepal Balloon Explosion (फोटो सौजन्य - ANI)

Nepal Balloon Explosion: नेपाळमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी पोखरा पर्यटन वर्षाच्या उद्घाटन समारंभात फुग्याच्या स्फोटात नेपाळचे उपपंतप्रधान (Nepal's Deputy PM) बिष्णू प्रसाद पौडेल (Bishnu Prasad Paudel) आणि पोखरा महानगराचे महापौर धनराज आचार्य (Dhanraj Acharya) थोडक्यात बचावले. या सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांनाही विमानाने काठमांडूला नेण्यात आले आहे. तसेच पुढील उपचारांसाठी त्यांना कीर्तिपूर येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे एएनआयने वृत्त दिले आहे.

पोखरा पर्यटन वर्षाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी उपपंतप्रधान घटनास्थळी गेले होते. यादरम्यान अचानक आग लागली. येथे हवेत फुगे सोडले जाणार होते. परंतु, याच दरम्यान ते फायर पॉपर्सच्या संपर्कात आले आणि त्याचा स्फोट झाला. अपघातानंतर, पोलिसांनी पुष्टी केली की, पौडेल आणि आचार्य दोघांनाही तातडीने काठमांडूला नेण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी पोखरा मेट्रोपॉलिटन सिटीमधून लाईव्ह स्ट्रीम केलेल्या व्हिडिओमध्ये, स्फोटानंतर उपपंतप्रधान पौडेल धावताना दिसले. तसेच महापौर आचार्य स्टेजवरून चौकटीबाहेर पलीकडे पळाले. दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. असे सांगण्यात येत आहे की, ऑटोमॅटिक स्विचमुळे आग लागल्याने हा स्फोट झाला आणि हायड्रोजनने भरलेल्या फुग्याला आग लागली.