अबब ! मृत्युनंतरही अब्जावधींची कमाई करत आहेत ही मंडळी; मायकल जॅक्सन पहिल्या स्थानावर
मायकल जॅक्सन (Photo Credits:Youtube/Facebook)

जगप्रसिद्ध फोर्ब्स या मासिकातर्फे नुकतीच, जे लोक मृत आहेत मात्र अजूनही त्यांच्या नावावर करोडोंची संपत्ती आहे अथवा अजूनही ते कमाई करत आहेत अशा लोकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये पॉप सिंगर मायकल जॅक्सन (एमजे)ला पहिले स्थान मिळाले असून, 1977मध्ये मरण पावलेला गायक एल्व्हिस प्रिस्ले हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीमधील टॉप-10 लोकांमध्ये 5 लोक हे संगीतकार आहेत.

फोर्ब्स मासिकानुसार 25 जून, 2009 मध्ये मरण पावल्यानंतर आजपर्यंतच्या या 9 वर्षांमध्ये मायकल जॅक्सनच्या नावावर 2.4 बिलियन डॉलर (17,110 करोड रुपये) इतकी कमाई झाली आहे. फक्त 2018 मध्ये एमजेच्या नावावर एकूण 400 मिलियन डॉलर (2935 करोड रुपये) जमा झाले आहेत.

दुसऱ्या स्थानावर असलेल्या एल्व्हिस प्रिस्लेचा मृत्यू 40 वर्षांपूर्वी झाला आहे. इतक्या वर्षांनंतरही त्याच्या नावावर प्रत्येक वर्षी जवळजवळ 10 लाख अल्बम विकले जातात. वर्षाला त्याच्या नावावर सरासरी 40 मिलियन डॉलर (293 करोड रुपये) इतकी कमाई होते. या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे गोल्फर अर्नाल्ड पामर.

                                                                          Top - 10

कार्टूनिस्ट चार्ल्स स्कल्ज हे चौथ्या स्थानावर असून, त्यांची कमाई 34 मिलियन डॉलर (249 करोड रुपये) इतकी आहे. त्यानंतर संगीतकार बॉब मार्ले यांचा नंबर लागतो. 2018 मध्ये त्यांची कमाई 23 मिलियन डॉलर (168 करोड रुपये) इतकी आहे.

हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मन्रो हिला या यादीमध्ये आठवे स्थान मिळाले आहे. तिची कमाई 14 मिलियन डॉलर (102 करोड रुपये) इतकी सांगितली जात आहे. मार्लिन या यादीमध्ये सामील होणारी एकमेव महिला सेलेब्रिटी आहे.