कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे अवघे जग लॉकडाऊन (Lockdown) आहे. अर्धे जग कोरोना व्हायरस नियंत्रणात तर अर्धे जग कोरोना व्हायरस संकटावर उपाय शोधण्याकामी लागले आहे. अशात नायजेरीया (Nigeria) देशातून एक आश्चर्य करणारी बातमी आहे. इथे एका महिलेने चक्क 68 व्या वर्षी म्हणजेच वायाच्या सत्तरीला केवळ दोन वर्षे कमी असताना जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. आश्चर्य केवळ या महिलेने 68 व्या वर्षी बाळांना जन्म दिला म्हणून नाही. तर, या महिलेने कृत्रिम गर्भधारणा (In Vitro Fertilisation) करण्याचे प्रयोग 3 वेळा अयशस्वी झाल्यानंतर चौथ्या प्रयत्नात तिने या बाळांना जन्म दिला आहे. या वयात इतके मोठे आव्हान स्वीकारणे हे एक आश्चर्यकारकच आहे.
वयाच्या 68 व्या वर्षी जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या महिलेचे नाव Margarett Adenuga असे आहे. CNN ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या महिलेने 14 एप्रिल या दिवशी जुळ्या मुलांना जन्म दिला. या जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा दुसरी मुलगी आहे. महिलेचा पती Noah Adenuga यांने सांगितले की, गेल्या वर्षी आपली पत्नी गर्भवती राहिली होती. या आधी तीन वेळा तिची कृत्रिम गर्भधारणा (IVF) अयशस्वी ठरली होती. पण, असे घडूनही आम्ही प्रयत्न सोडले नाहीत.
इंडिया टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, महिलेच्या पतीने 1996 मध्ये वडील व्हायचे स्वप्न पाहिले होते. तो सांगतो की, अखेर अनेक प्रयत्न आणि प्रदीर्घ काळ संयम दाखवल्यानंतर आम्ही यशस्वी झालो. मी एक स्वप्न पाहणारा माणूस आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही एक दिवस यशस्वी होऊ. (हेही वाचा, Coronavirus: पुण्यातील 92 वर्षीय आजींची कोरोनावर मात, परिवारातील अन्य 4 जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज)
दरम्यान, या महिलेवर शस्त्रक्रिया करणाऱ्या Dr. Adeyemi Okunowo यांनी म्हटले की, या महिलेचे बाळंतपण करताना सिजेरियन करावे लागले. वाढत्या वयात गर्भधारणा झाल्याने आणि ही महिला पहिल्यांदाच आई बनत असल्याने धोका अधिक प्रमाणात होता. दोन्ही जुळ्या मुलांना सिजेरियन शस्त्रक्रिया करुन जन्म द्यावा लागला. दोन्ही बाळांची प्रकृती छान आहे. त्यांच्या आईची प्रकृतीही छान आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.