
अमेरिकेतील उटाह (Utah- US) येथून हत्येचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने पत्नी, पाच मुले आणि सासूची हत्या करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पत्नीने कोर्टात घटस्फोटासाठी (Divorce) अर्ज केल्यानंतर दोन आठवड्यांनंतर हा सर्व प्रकार घडला. ही घटना उटाह राज्यातील एनोक शहरातील आहे. मृतांमध्ये 40 वर्षीय तौशा हाईट, 78 वर्षीय गेल अर्ल, 4 ते 17 वर्षे वयोगटातील दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. सर्व हत्या 42 वर्षीय मायकेल हाईटने केल्या आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकाच घरात 8 मृतदेह सापडल्याने त्यांना धक्का बसला. त्यामुळे आजूबाजूचे लोकही घाबरले आहेत. व्हाईट हाऊसने गुरुवारी एक निवेदन जारी केले की अध्यक्ष जो बिडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांनाही या घटनेमुळे दुःख झाले आहे. बंदुकीसारख्या शस्त्रांवर बंदी घालण्याबाबतही या निवेदनात चर्चा करण्यात आली आहे. निवेदनानुसार, अमेरिकेतील शाळा, घरे आणि समुदाय सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार बंदूक नियंत्रणावर काम करत आहे.
अधिका-यांनी सांगितले की कुटुंबातील सर्व सदस्य नियमितपणे चर्चला जात होते. सामाजिक सामुदायिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत होते. त्यामुळे शहरातील बहुतेक लोक त्यांना ओळखत होते. घटनेच्या आदल्या रात्री तौशा आणि इतर सदस्य चर्चमध्ये दिसले होते. दुसऱ्या दिवशी तौशा चर्चच्या बैठकीमध्ये दिसली नाही. कुटुंबाचा संपर्क न झाल्याने लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.
तौशाचे वकील जेम्स पार्क यांनी सांगितले की, तौशाने 21 डिसेंबर रोजी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ही कागदपत्रे 27 डिसेंबर रोजी मायकेलला देण्यात आली. मात्र, त्यानंतर तिचा नवरा तिला कोणत्याही प्रकारे त्रास देईल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र आता मायकेलने कुटुंबातील सर्वांची हत्या केली आहे. महापौर जेफ्री चेस्नट म्हणतात, घटस्फोट हेच हत्येचे कारण आहे, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. (हेही वाचा: Women Cut Off Husband's Penis: मुलीवर बलात्कार करत होता पती; संतप्त महिलेने कापून टाकले लिंग)
दरम्यान, अमेरिकेत कुटुंबांमध्ये सामूहिक हत्या होण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. यूएसए टुडे, असोसिएटेड प्रेस आणि नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये अशी 17 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 14 गोळीबाराच्या घटना होत्या आणि 10 खून-आत्महत्येच्या घटना होत्या. सामूहिक हत्या म्हणजे अशा घटना ज्यात 4 किंवा त्याहून अधिक लोक मारले गेले आहेत.