Palisades Fire (Photo Credits: X/@SiaKordestani)

अमेरिकेतील लॉस एंजेलिसच्या (Los Angeles) जंगलात नवीन आग (Fire) लागली आहे. त्याचा परिणाम आता आसपासच्या इमारतींवरही होऊ लागला आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1100 हून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. लॉस एंजेलिसच्या हॉलिवूड हिल्समध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सुमारे 70,000 लोकांना बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. सोसाट्याचा वारा असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत, तर वाऱ्यामुळे आग अधिकच तीव्र झाली आहे. परिस्थिती पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी कॅलिफोर्नियातील सांता मोनिका फायर स्टेशनला भेट दिली व आगीची माहिती घेतली.

या भागातील ही आतापर्यंतची सर्वात विनाशकारी आग असल्याचे बोलले जात आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीने आता भीषण रूप धारण केले आहे. ही आग लॉस एंजेलिस आणि आता हॉलिवूड हिल्सपर्यंत पसरली आहे. ही भाषण आग पाहता राज्यात आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे. तसेच यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी त्यांचा इटली दौरा रद्द केला आहे.

हेलिकॉप्टरमधून होत आहे पाण्याची फवारणी-

पॅसिफिक पॅलिसेड्स, ईटन आणि हर्स्टमध्ये पसरलेल्या आगीशी लढण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमधून पाण्याची फवारणी केली जात आहे. पॅलिसेड्समध्ये 15 हजार एकर, ईटनमध्ये 10 हजार एकर आणि हर्स्टमध्ये 500 एकरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हजारो अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. लॉस एंजेलिसचे अग्निशमन अधिकारी क्रिस्टन क्रोली यांनी सांगितले की, अद्याप धोका टळला नाही.

Los Angeles Fire: 

परिसरात मोठे नुकसान-

समुद्रकिनारी एका टेकडीवर वसलेल्या या भागात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींचे निवासस्थान आहे आणि अनेक उत्कृष्ट चित्रपटांचे चित्रीकरणही येथे झाले आहे. मात्र आगीमुळे इथले सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. पॅसिफिक कोस्ट हायवेवरील घरे आणि व्यावसायिक आस्थापनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गीमुळे आतापर्यंत 6500 एकरहून अधिक जमीन रिकामी करण्यात आल्याचे विभागाचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे घरही रिकामे करण्यात आले आहे. (हेही वाचा: Nepal-Tibet Earthquake: नेपाळ-तिबेट भूकंपात १२६ जणांचा मृत्यू, अनेक घरे कोसळली)

दरम्यान, अधिकाऱ्यांनी चेतावणी दिली आहे की 160 किमी/तास वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे आगीची परिस्थिती आणखी बिघडण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे लॉस एंजेलिस काउंटीमधील सर्व रहिवाशांना धोका निर्माण होऊ शकतो. या आगीत कोट्यवधी रुपयांची घरे जळून खाक झाली आहेत. Accuweather ने अंदाज लावला आहे की, आगीत एकूण नुकसान $57 अब्ज पर्यंत पोहोचू शकते.