अमेझॉनचा फाऊंडर जेफ बेझोस (Jeff Bezos), हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक ओळखला जातो. मात्र फक्त दोनच दिवसांत या इतक्या श्रीमंत व्यक्तीने तब्बल 79 हजार कोटी रुपये गमावले आहेत. बाजारातील शेअर्समुळे जेफला इतका मोठा तोटा सहन करावा लागल्याचे सांगितले जात आहे.
फोर्ब्स मासिकाने दिलेल्या माहितीप्रमाणे, कंपनीचे शेअर गुंतवणूकदारांनी विकायला सुरूवात केली, आणि या गोष्टीचा सर्वात जास्त फटका बसला आहे तो जेफ बेझोसला. असे असले तरी जेफ भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतले आपले स्थान टिकवून आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर बिल गेट्स आणि तिसऱ्या स्थानावर वॉरेन बफे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर हा तिमाही अमेझॉनसाठी अतिशय नुकसानकारक ठरला आहे. नुकतीच या तिमाहीमध्ये अमेझॉनच्या झालेल्या मिळकतीची घोषणा करण्यात आली. अपेक्षेपेक्षा अतिशय कमी नफा कंपनीला मिळाल्यामुळे गुंतवणुकदारांनी अमेझॉनमध्ये त्यांचे असलेले शेअर विकायला सुरूवात केली. एका महिन्यात अमेझॉनचे शेअर्स तब्बल 23 टक्क्यांनी घसरले आहेत. अमेझॉनमध्ये जेफचा स्वतःचा वाटा 16 टक्के इतका आहे. झालेल्या इतक्या मोठ्या नुकसानानंतरही जेफची संपत्ती साधारणपणे 9.18 लाख कोटी रुपये सांगितली जाते.