Israel-Palestine War | (PC - ANI/X)

इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने (Israel)1 लाख पॅलेस्टिनींना त्यांच्या देशातून हाकलून देण्याची योजना तयार केली आहे. या पॅलेस्टिनींच्या जागी इस्रायल 1 लाख भारतीय कामगारांना नोकऱ्या देणार आहे. सोशल मिडिया साईट एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पत्रकार आदित्य राज कौल यांनी सांगितले की, इस्रायलने भारताला लवकरात लवकर 1 लाख कामगार उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. हे कामगार पॅलेस्टिनींची जागा घेतील, कारण 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर त्यांना काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता इस्रायल पॅलेस्टिनींना रोजगाराची परवानगी देणार नाही.

अहवालानुसार, भारत आणि इस्रायलने 42,000 भारतीयांना इस्रायलमध्ये काम करण्यासाठी पाठवण्याचे आधीच मान्य केले आहे. यासाठी मे 2023 मध्ये दोन्ही देशांदरम्यान एक करार झाला होता. जर आता 1 लाख अधिक कामगार पाठवायचे ठरल्यास  ही संख्या तिप्पट होईल. उल्लेखनीय आहे की इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने ऑक्टोबर 2015 मध्ये इस्रायलवर हल्ला करून 1,400 लोक मारले होते. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने गाझा आणि पॅलेस्टाईनमधील लोकांवर काम, प्रवास आणि इतर निर्बंध लादले.

इस्रायलमधील पॅलेस्टिनी कामगार पॅलेस्टाईन किंवा गाझामधील कामगारांपेक्षा खूप जास्त कमावतात. मात्र, या हल्ल्यानंतर आता त्यांच्यावर अविश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे त्यांना हटवून त्यांच्या जागी भारतातून आणलेल्या कामगारांना काम देण्यात येणार आहे. काढले जाणारे बहुतेक पॅलेस्टिनी बांधकाम क्षेत्रात काम करतात. त्यांना हटवल्यामुळे इस्रायलमध्ये अचानक कामगारांची कमतरता निर्माण झाली आहे. कामगारांच्या कमतरतेमुळे क्षेत्राला बाधा येणार नाही याची खात्री करण्यासाठी, इस्रायली बिल्डर्स असोसिएशनने 50,000-1,00,000 च्या श्रेणीतील भारतीय कामगारांना मान्यता देण्याचे आवाहन सरकारला केले आहे. (हेही वाचा: Israeli Air Attack On Refugee Camp: गाझामधील निर्वासित शिबिरावर बॉम्बस्फोट, 50 हून अधिक ठार)

या असोसिएशनचे उपाध्यक्ष हैम फीग्लिन म्हणाले, ‘आम्ही सध्या भारताशी चर्चा करत आहोत आणि इस्त्रायली सरकार या उपक्रमाला मान्यता देईल याची वाट पाहत आहोत. आम्ही भारतातून 50,000 ते 1,00,000 कामगारांना वेगवेगळ्या क्षेत्रात आणण्याची योजना आखत आहोत. इस्रायलमध्ये सध्या सुमारे 18,000 भारतीय कामगार आहेत. यापैकी बहुतेक महिला असून, त्या वृद्ध किंवा मुलांची काळजी घेतात. याव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने भारतीय इस्रायलमध्ये आयटीसारख्या क्षेत्रात काम करतात.