Israel-Palestine Conflict: हमासचा इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला, 130 रॉकेट डागले; भारतीय महिला ठार
Hamas biggest attack on Israel (PC - ANI)

Israel-Palestine Conflict: यरुशलममधील अल-अक्सा मशिदीत सोमवारी पॅलेस्टाईन आणि इस्त्रायली सुरक्षा दलातील चकमकीने आता हिंसक रूप धारण केले आहे. या घटनेनंतर पॅलेस्टाईन आणि इस्राईलमधील युद्ध पुन्हा पाहायला मिळाले. दोन्ही बाजूंकडून रॉकेट डागले असून आतापर्यंत 32 पॅलेस्टाईन लोकांनाचा मृत्यू झाला आहे. हमास रॉकेट हल्ल्यात एका भारतीय महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आली आहे. सौम्या संतोष असे या महिलेचे नाव असून ती गेल्या सात वर्षांपासून इस्रायलमध्ये राहत होती. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सोमवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या या चकमकीत मुले आणि महिलांसह 32 पॅलेस्टाई नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक मृत्यू हवाई हल्ल्यामुळे झाले आहेत. (वाचा - चीनचे Long March 5B Rocket हिंदी महासागरात कोसळले; धोका टळला)

हमास रॉकेट हल्ल्यात भारतीय महिला ठार

इस्त्रायली परराष्ट्र मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की, हमासने रहिवासी क्षेत्रात सुमारे 130 रॉकेट डागले. या घटनेमुळे जेरुसलेममध्ये प्रचंड हिंसाचार उडाला आहे. अशाच एका हल्ल्यात भारतीय महिला सौम्या संतोषही ठार झाली. इस्त्रायली राजदूत डॉ. रॉन मलका यांच्या वतीने ट्वीट करुन ही माहिती दिली गेली असून त्यांनी कुटुंबाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हल्ल्याच्या वेळी सौम्या एका 80 वर्षीय महिलेबरोबर घरी होती. ती त्या महिलेची केयरटेकर होती. पण त्याचे घर हमास रॉकेट हल्ल्यात टिकू शकले नाही. यात सौम्याला आपला जीव गमवावा लागला. 80 वर्षीय वृद्ध महिला या हल्ल्यामुळे वाचली असून तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी सौम्या पतीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होती. परंतु, हा हल्ला अचानक झाला आणि व्हिडीओ कॉल थांबला. या घटनेचा एक व्हिडिओ इस्त्रायली संरक्षण दलाने सोशल मीडियावरही शेअर केला आहे, ज्यामध्ये आकाशात अनेक रॉकेट्स दिसत आहेत. हमासच्या या हल्ल्यानंतर इस्राईल कोणतीही मोठी कारवाई करू शकते, असं म्हटलं जात आहे. गाझा सीमेवर 5 हजार सैनिक तैनात करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्याचबरोबर केवळ हवाई हल्ल्यांद्वारे योग्य उत्तर देण्याचा विचार केला जात आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडूनही तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. हमासने सर्व सीमारेषा ओलांडल्या आहेत आणि आता त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.