मोहम्मद तौफिक अलावी इराकचे नवे पंतप्रधान; राष्ट्रपती बरहम सालेह यांनी केली घोषणा
Iraq New Prime Minister Mohammad Taufiq Allawi (PC- Twitter)

इराकचे नवे पंतप्रधान (Iraq New Prime Minister) म्हणून मोहम्मद तौफिक अलावी (Mohammad Taufiq Allawi) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. इराकचे राष्ट्रपती बरहम सालेह (Barham Salih) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. इराकमध्ये मागील 4 महिन्यांपासून सरकारविरोधी निदर्शने सुरू होती. यात सुमारे 500 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवनिर्वाचित पंतप्रधान अलावी यांनी स्वत:च्या नियुक्तीच्या घोषणेनंतर चित्रफित शेअर करत निदर्शकांना संबोधित केले आहे. निदर्शकांमुळे मला हे पद मिळाले. तुमचे साहस आणि बलिदान देशात बदल घडवून आणेल. मी निदर्शकांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करील, अशी ग्वाहीही यावेळी अलावी यांनी दिली आहे. सध्या अलावी यांचे वय 65 वर्ष असून त्यांनी माजी पंतप्रधान नूरीअल-मलिकी यांच्या सरकारमध्ये दूरसंचार मंत्री पदाची जबाबदारी पार पाडली आहे.  (हेही वाचा - Locust Attack: टोळ कीटकांचा पाकिस्तानवर हल्ला; इम्रान खान सरकारने घोषित केली 'राष्ट्रीय आणीबाणी')

अलावी यांनी तत्कालीन पंतप्रधानांवर राजकीय हस्तक्षेपाचा आरोप करत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच इराकमधील निदर्शकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नसल्याचेही अलावी यांनी म्हटले होते. अलावी यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अर्थव्यवस्था सुधारणा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाईचे आश्वासन दिले आहे. अलावी यांना नवीन मंत्रिमंडळाची स्थापन करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.