
कोंबडी आधी की अंडे? (Chicken and Egg Riddle) हा प्रश्न केवळ भारतीय मंडळींनाच नव्हे तर जगभरातील अनेक लोकांना पडतो. पण या कोड्याचे उत्तर मिळवताना कधी हिंसक घटना झाल्याचे आजवर ऐकिवात नाही. पण इंडोनेशिया (Indonesia) देशात मात्र असे घडले आहे खरे. या देशातील एका दारुड्या व्यक्तीने कोंबडी (Chicken) आधी की अंडे (Egg) या कोड्याचे उत्तर देता आले नाही म्हणून चक्क आपल्या मित्राची हत्या केली. ही घटना दक्षिणपूर्व सुलावेसी प्रांतातील मुना रिजन्सी येथे 24 जुलै रोजी घडली. डीआर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयिताने त्याचा मित्र कादिर मार्क्स याला दारू पिण्यासाठी बोलावले होते. या वेळी त्याने हे कृत्य केले.
कोंबडी आधी की अंडे?
डीआर आणि मार्कस यांनी एकत्रितपणे दारुचे एकापाठोपाठ असे अनेक पेग रिचवले. थोड्या वेळाने डीआरने मार्क्सला कोंबडे आधी की अंडे? हे कोडे घातले. त्यानंतर दोघांमध्ये कोंबडी आधी की अंडे या जगप्रसिद्ध कोड्यावरुन वाद सुरु झाला. काही वेळातच ही चर्चा जोरदार वादावादीपर्यंत पोहोचली. मार्कसने, पुढील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करत, डीआरला तिथेच सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, संतापलेल्या डीआरने सुरुवातीला मार्क्सला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याने त्याच्या दुचाकीची तोडफोड केली. नंतर जीव वाचविण्यासाठी मार्क्स पळू लागला असता डीआरने त्याच्यावर बडिकने हल्ला केला. बडिक हे स्थानिक समुदयातील खंजीरासारखे पारंपरिक शस्त्र मानले जाते. (हेही वाचा, Python Swallows Woman in Indonesia: इंडोनेशियामध्ये 16 फुट महाकाय अजगराने महिलेला पूर्णपणे गिळंकृत केले; पोटात आढळला मृतदेह)
दोष सिद्ध झाल्यास 18 वर्षांपर्यंत तुरुंगवास
दरम्यान, घटनास्थळावरील स्थानिक नागरिकांनी मार्कस याला रुग्णालयात दाखल केले. परंतू तोपर्यंत त्याचा मत्यू झाला होता. घटना घडली तेव्हा दोघेही दारुच्या नशेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. टोंगकुनोचे पोलिस प्रमुख इप्टू अब्दुल हसन यांनी डीआरच्या अटकेची पुष्टी केली आणि सांगितले की, गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि संशयिताने घातलेली पायघोळ जप्त केली आहे. डीआरवर हत्येचा आरोप आहे आणि दोष सिद्ध झाल्यास 18 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल. 26 जुलै रोजी मार्कसवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर हत्येचा तपास अद्याप सुरू आहे.
गेल्या वर्षी अशाच एका घटनेत आणखी एका इंडोनेशियन व्यक्तीने व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्यानंतर त्याच्या मित्राची हत्या केली होती. स्ट्रेट्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार हा वाद, XTC बिअर 188 नावाच्या चॅट ग्रुपमध्ये झाला. जो मोटारसायकलभोवती केंद्रित होता. तोच एकाच्या जीवावर बेतला आणि तो प्राणघातक ठरला. तोयबान हा व्यक्ती त्याचा मित्र आणि एडमीन एड्रियन याने त्याला व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्यानंतर दुखावला गेला होता. त्यामुळे त्याच्यात आणि एड्रीयन याच्यात वाद झाला. जो हिंसक झाला. तोयबानने एड्रियनवर चाकूने वार केले, परिणामी त्याचा मृत्यू झाला.