Indonesia Elections. (Photo Credits: Getty Images)

17 एप्रिल रोजी इंडोनेशिया (Indonesia) येथे अध्यक्षीय, लोकसभा आणि प्रादेशिक निवडणूका पार पडल्या. निवडणुकीचा खर्च कमी करण्यासाठी देशात सर्व निवडणुका एकाच दिवशी घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवातही झाली. या एका दिवसाच्या कामाचा ताण इतका होता की निवडणुकीनंतर तब्बल 272 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 1878 कर्मचारी आजारी पडले आहेत. इंडोनेशिया इथे मतपत्रिकांवर मतमोजणी केली जाते. मतदानानंतर पुढच्या पुढच्या प्रक्रियेच्या ताणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे.

इंडोनेशियाची लोकसंख्या 26 कोटी इतकी आहे. यामध्ये 19.3 कोटी मतदारांपैकी 80 टक्के लोकांनी मतदान केले. या मतदानासाठी देशात 8 लाख मतदान केंद्रे उभारली होती. एका दिवसात जगातील सर्वात मोठी निवडणूक लढवण्याचा विक्रम करण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या निवडणुकांचे आयोजन करण्यात आले होते. ही मतदान प्रक्रिया 8 तास चालली, या गोष्टीचा ताण कर्मचाऱ्यांवर होताच त्यानंतर लगेचच मतमोजणी सुरु झाली. अशा प्रकारे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये थकव्यामुळे शनिवारपर्यंत 272 लोकांचा मृत्यू झाला.

(हेही वाचा: निवडणूक कामांबाबत कामचुकार करणाऱ्या 400 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल; कठोर कारवाईचे आदेश)

17 एप्रिलला झालेल्या मतदानानंतर 70 लाख लोक मतमोजणीच्या प्रक्रियेत गुंतले होते. निवडणूक प्रक्रियेतील कामांमुळे आजारी पडलेल्या कर्मचाऱ्यांना उत्तम उपचार मिळावेत म्हणून उपाययोजना करण्याच्या सूचना इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पदवी म्हणून अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर घेतले होते. कामाला सुरुवात करण्यापूर्वी या लोकांचे आरोग्य तपासणी केली गेली नव्हती, त्यामुळे या घटनेसाठी सरकारला जबाब्द्दार ठरवले जात आहे.