Photo Credit- Pixabay

Indian fisherman Dies in Pakistan: पाकिस्तानमधील कराची तुरुंगात (Karachi jail) भारतीय मच्छीमाराचा (Indian Fisherman Dies)मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 2022 मध्ये त्या मच्छिमाराला पाकिस्तानी (Pakistan)अधिकाऱ्यांनी अटक केली होती. बाबू असे मृत मच्छिमाराचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे त्याला सुनावलेली शिक्षा पूर्ण झाली होती. तरी त्याला सोडले गेले नव्हते. त्याचे भारतीय नागरिकत्व देखील निश्चित झाले होते. तरीही पाकिस्तानने त्याला सोडले नाही. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, 23 जानेवारी 2025 रोजी त्याचा मृत्यू झाला.

गेल्या दोन वर्षांत पाकिस्तानी तुरुंगात भारतीय मच्छिमाराचा मृत्यू होण्याची ही आठवी घटना आहे. सध्या सुमारे 200 भारतीय मच्छीमार पाकिस्तानी तुरुंगात कैद आहेत. त्यांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे पण अद्याप त्यांची सुटका झालेली नाही. भारत सरकार पाकिस्तानसोबतच्या उच्चस्तरीय चर्चेत मच्छिमारांच्या सुटकेचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहे. भारताने मानवतेच्या आधारावर भारतीय मच्छिमार आणि इतर कैद्यांची लवकर सुटका करण्याची वारंवार विनंती केली आहे. पाकिस्तान अनेकदा भारतीय मच्छिमारांना सागरी सीमा ओलांडल्याच्या आरोपाखाली अटक करतो.

यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये, ऑक्टोबर 2022 मध्ये पाकिस्तानी एजन्सींनी पकडलेल्या महाराष्ट्रातील मच्छीमार विनोद लक्ष्मण कोयल यांचा मृत्यू झाला होता. त्यांना कराची तुरुंगात ठेवण्यात आले. जिथे त्यांना 8 मार्च रोजी अर्धांगवायूचा झटका आला आणि 17 मार्च रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 20 डिसेंबर 2024 रोजी जारी केलेल्या निवेदनात, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की 209 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानमध्ये ओलीस ठेवण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अहवालात म्हटले की, 209 मच्छिमारांपैकी 51 जण 2021 पासून पाकिस्तानमध्ये तुरुंगात आहेत. 130 जण 2022 पासून तुरुंगात आहेत. तर नऊ मच्छिमार 2023 पासून आणि 19 जण 2024 पासून तुरुंगात आहेत. 2014 पासून शेजारील देश पाकिस्तानमधून 2639 भारतीय मच्छिमारांना परत आणण्यात आल्याचेही या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.