पूर्व लडाख सीमेवर भारत (India) आणि चीन (China) मधील तणाव अजूनही कायम आहे. लडाखमध्ये चीनने आपल्या कारवाया अजूनही रोखल्या नाहीत. आता त्याने भारत सीमेवर युद्धाचा अभ्यास करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, आता चीनने भारताच्या अरुणाचल प्रदेशवर (Arunachal Pradesh) प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन (Zhao Lijian) यांनी अरुणाचल प्रदेशला चीनचा भाग म्हणून संबोधले आहे. चीनचे सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सच्या मते, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी एका निवेदनात अरुणाचल भारताचा भाग नसल्याचे म्हटले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की. 'चीनच्या दक्षिणेकडील तिबेट प्रदेश अरुणाचल प्रदेश आहे, त्याला चीनने भारताच्या असल्याची कधीच मान्यता दिली नाही.' यासह अरुणाचल प्रदेशमधील 5 भारतीय तरुणांच्या अपहरणप्रकरणी चिनी प्रवक्त्याने सांगितले की, आमच्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नाही किंवा भारतीय सैन्याने असे कोणतेही अपील केले नाही.
अरुणाचल प्रदेशचे कॉंग्रेसचे आमदार निनॉंग एरिंग यांनी चिनी सैनिकांनी 5 भारतीयांचे अपहरण केल्याचा धक्कादायक दावा करत ट्विट केले होते. एरिंग म्हणाले की, राज्यातील अप्पर सुबानसिरी जिल्ह्यातील 5 जणांना पीएलएच्या जवानांनी कथितरित्या नेले आहे. त्याचवेळी ‘द अरुणाचल टाईम्स’ मध्येही या संदर्भातील एक बातमी प्रसिद्ध झाली होती. बातमीनुसार असा दावा केला गेला होता की, अपहरण केलेले पाचही लोक तागिन समुदायाचे आहेत. ते जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते.
चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने तीन रणनीतिक शिखरांवर आपली तैनाती वाढविली आहे आणि लद्दाखमधील एलएसीवरील सीमा सुरक्षित करण्यासाठी आपले स्थान बदलले आहे. रविवारी अरुणाच पश्चिमचे भाजपा खासदार आणि केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट केले होते की, 'चिनी पीएलएकडून मेदंबा राय / मेयाबा राय सीमा भागातून 5 अरुणाचल्यांच्या अपहरण प्रकरणी, मिळालेल्या माहितीवरून भारतीय सैन्याने अरुणाचल प्रदेशातील सीमा केंद्राकडून पीएलए आस्थापनाच्या समकक्षांना हॉटलाईन संदेश पाठविला आहे.