
जगात गेले एक वर्षे कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने धुमाकूळ घातला आहे. या विषाणूने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. अशात लोकांच्या सर्व आशा येऊ घातलेल्या लसीवर अवलंबून आहे. आता अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये (California) फायझर कोरोना व्हायरस लस (Pfizer Vaccine) दिल्याच्या काही दिवसानंतर मॅथ्यू डब्ल्यू नावाच्या एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. अशाप्रकारे फायझर लसविषयी धक्कादायक बातमी लोकांमधील या लसीबद्दलची भीती वाढवू शकते. मॅथ्यू दोन रुग्णालयात काम करतो. 18 डिसेंबर रोजी मॅथ्यू डब्ल्यू यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये फायझर लस घेतल्याची बातमी दिली होती.
या नर्सने एबीसी न्यूजला सांगितले की, लस घेतल्याच्या एक दिवसानंतर त्यांचे हात सुजले होते, याशिवाय इतर कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. पुढे सहा दिवसांनंतर त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. लसीकरणानंतर सहा दिवसांपर्यंत ते कोविड-19 च्या वॉर्डात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला त्याला थंडी वाजून आली आणि नंतर त्यांचे स्नायू दुखायला सुरुवात झाली व थकवा जाणवू लागला. ख्रिसमसच्या दुसर्या दिवशी मॅथ्यू ड्राईव्ह-अप हॉस्पिटलच्या चाचणी साइटवर गेले आणि स्वतःची चाचणी करून घेतली. त्यावेळी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. (हेही वाचा: US: डोनाल्ड ट्रंम्प यांची COVID19 Relief Package वर स्वाक्षरी, अमेरिकेतील नागरिकांना मिळणार आर्थिक मदत)
तज्ञ म्हणतात की लस घेतल्यानंतर काही दिवसांनी कोरोना पॉझिटिव्ह होण्याची घटना फार आश्चर्यकारक नाही. अमेरिकेतील सॅन डिएगो येथील संसर्गजन्य रोग तज्ञ क्रिश्चियन रॅमरस म्हणाले की, लस चाचणीमध्ये असे सिद्ध झाले आहे की, लस घेतल्यानंतर केवळ 10 ते 14 दिवसांनंतरच एखाद्या व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती तयार होते. पूर्ण संरक्षणासाठी लसीचा आणखी एक डोस आवश्यक आहे. रामर्सच्या मते, लसचा पहिला डोस आपल्याला सुमारे 50% प्रतिकारशक्ती प्रदान करतो आणि 95% पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दुसरा डोस घेणे आवश्यक आहे.
व्हॅक्सीन अॅडव्हायझरी ग्रुपच्या मते, फायझरची लस 16 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी सुरक्षित आहे. फायझर कंपनीने दावा केला आहे की त्यांची कोरोना लस 95 टक्के प्रभावी आहे.