Husband On Rent: ऐकावे ते नवलच! महिलेने सुरु केला पतीला भाड्याने देण्याचा व्यवसाय; जाणून घ्या कारण व शुल्क
Husband On Rent (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजकाल महागाईच्या काळात घराचे बजेट सांभाळायचे असेल तर दोन पैसे जास्तीचे मिळावेत अशी सामान्य माणसाची इच्छा असते. यासाठी अनेक लोक एकाच वेळी वेग-वेगळ्या प्रकारचे व्यवसाय करत असतात. पैसे मिळवण्यासाठी लोक आपले घर, गाड्या अशा गोष्टीही भाड्याने देत असतात. परंतु कोणी आपल्या पतीला भाड्याने (Husband On Rent) देत असेल ही गोष्ट ऐकिवात आली नसेल. परंतु युनायटेड किंगडममधील (UK) एका महिलेने पतीला भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.

सोशल मीडियावर जाहिराती देऊन महिलेने पतीला भाड्याने द्यायचे असल्याचे सांगितले आहे. 3 मुलांची आई लॉरा यंगची ही सर्व्हिस सध्या खूपच चर्चेत आहे, जी तिने 'Hire my handy hubby' या नावाने सुरू केली आहे. मिररच्या वृत्तानुसार, लॉरा यंग नावाच्या महिलेचा पती जेम्स टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करतो. गोष्टी तोडणे, जोडणे, नव्याने काही बनवणे याचा त्याला छंद आहे. थोडक्यात तो एक जुगाडू व्यक्ती आहे. या छंदामुळे, तो DIY गोष्टींमध्ये मास्टर आहे.

या कौशल्यामुळे त्याने आपले जुनाट घरही अतिशय सुंदर आणि अद्वितीय बनवले आहे. पाणी-विजेपासून ते फर्निचरपर्यंतची कामे उत्तम पद्धतीने कशी करायची हे त्याला माहीत आहे. लॉरा यंगला आपल्या पतीची हीच कला एक अतिरिक्त उत्पन्नाचे साधन बनवायची होती. म्हणूनच तिने अशा कामांसाठी पती भाड्याने देण्याची सर्व्हिस सुरु केली.

लॉरा म्हणते की, तिच्या नवऱ्याच्या कौशल्यामुळे अनेक लोक त्याला भाड्याने घेऊ शकतात. लॉराने या अनोख्या व्यवसायासाठी ‘रेंट माय हॅन्डी हसबंड’ नावाची वेबसाइट तयार केली आणि नेक्स्ट डोअर अॅप म्हणून फेसबुकवर त्याचा प्रचार केला. जेम्सने यापूर्वी एका गोदामात काम केले आहे, जे त्याने दोन वर्षांपूर्वी सोडले होते. आता अनेकांनी लॉराच्या या अॅपचे कौतुक केले असून, ते आजूबाजूच्या परिसरात लोकप्रियही झाले आहे. (हेही वाचा: व्यक्तीच्या खात्यात 43,000 पगाराऐवजी चुकून जमा झाले 1.42 कोटी; ताबडतोब राजीनामा देऊन झाला पसार)

लॉराने आपल्या नवऱ्याचे भाडे £35 (साधारण 3,360 भारतीय रुपये) ठेवले आहे. यामध्ये हा पती घरातील आवश्यक ती कामे करून देईल. अपंग लोक, ज्यांची काळजी घ्यावी लागत आहे असे लोक, युनिव्हर्सल क्रेडिटवर असलेले लोक आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सवलत दिली जात आहे.