Photo Credit- x

H5N1 Bird Flu: जगभरात बर्ड फ्लूचा धोका वाढत असून आता ऑस्ट्रेलियातही 2 वर्षांची चिमुकली बर्ड फ्लूने संक्रमीत झाल्याचे समोर आले आहे. सध्या मुलीची प्रकृती व्यवस्थित असून जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने शुक्रवारी पुष्टी केली की ऑस्ट्रेलियात गेल्या महिन्यात H5N1 बर्ड फ्लूची लागण झालेली मुलगी कोलकाता येथे गेली होती. WHO ने सांगितल्या प्रमाणे, बर्ड फ्लूचा विषाणू H5N1 दक्षिण-पूर्व आशियामध्ये पसरला आहे. या विषाणूमुळे मानवांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग होत आहे. ज्याचा परिणाम कुक्कुटपालनावरही दिसून आला आहे. (हेही वाचा:Avian Influenza: देशातील चार राज्यांमध्ये H5N1 व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला; केंद्रांने राज्यांना दिल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याच्या सूचना )

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, व्हिक्टोरिया येथील दोन वर्षांची मुलगी १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत कोलकाता येथे गेली होती. १ मार्च रोजी ती ऑस्ट्रेलियालात परतली होती. डब्ल्यूएचओने सांगितले की 22 मे पर्यंत, ऑस्ट्रेलिया किंवा भारतातील मुलीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यामध्ये बर्ड फ्लूची लक्षणे दिसून आली नाहीत.

व्हिक्टोरियाच्या आरोग्य विभागाने सांगितले की, मुलीला 2 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पूर्ण बरे होण्यासाठी तिला दोन आठवड्यांहून अधिक काळ रुग्णालयात ठेवावे लागले. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, "कुटुंबाने दिलेल्या अतिरिक्त माहितीवरून ते कोलकाता, भारताबाहेर गेले नव्हते आणि भारतात असतानाच ती संक्रमीत झाली. मात्र, ती आजारी व्यक्ती किंवा प्राण्याच्यादेखील संपर्क नव्हती. त्यामुळे मुलीला बर्ड फ्लूच्या विषाणूचा संसर्ग कसा झाला हे स्पष्ट नाही." असे व्हिक्टोरियामधील मुख्य आरोग्य अधिकारी क्लेअर लुकर यांनी एका निवेदनात म्हटले.

मात्र, तर्क लावत ती एकतर पोल्ट्री फार्म किंवा मार्केटच्या संपर्कात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या शिवाय, ती घरगुती पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्याने संक्रमीत झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ते पुढे म्हणाले, 'कधीकधी, पक्ष्यांचे मांस किंवा अंडी हाताळताना देखील लोक संक्रमीत होऊ शकतात.'

WHO ने एका निवेदनात म्हटले आहे की, 'जरी या प्रकरणात विषाणूच्या संपर्कात येण्याचे स्त्रोत अस्पष्ट असले तरी, या प्रकरणाची उत्पत्ती जेथे झाली आणि जेथे A(H5N1) विषाणूचे हे क्लेड पक्ष्यांमध्ये आढळले आहेत. तेथे संसर्ग होण्याची शक्यता आहे.'

फिलिपिन्सने ऑस्ट्रेलियातून पोल्ट्री उत्पादनांची आयात थांबवली

फिलीपिन्सच्या कृषी मंत्रालयाने शनिवारी (8 जून) रोजी सांगितले की, ऑस्ट्रेलियात बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियातून पोल्ट्री उत्पादनांच्या आयातीवर बंदी घातली आहे.