South African Tourism Minister Patricia de Lele press conference

भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता दक्षिण आफ्रिकेत जाण्यासाठी थेट व्हिसा अर्ज करता येणार आहे. दक्षिण आफ्रिका भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत (India's Top Airlines) कोड शेअरिंग भागीदारी (Code Sharing Partnership) करणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन मंत्री पॅट्रिशिया डे लिले आणि दक्षिण आफ्रिकन टुरिझन सीईओ नोम्बुलेलो गुलिवे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्या 30 वर्षांचे राजनैतिक संबंध, 30 वर्षांची लोकशाही आणि दक्षिण आफ्रिकेकडून2025 मध्ये जी20 चे अध्यक्षपद या संकल्पनेनुसार दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देत आहेत. याशिवाय, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील संबंधांवर तसेच लोकशाही मूल्ये आणि आपसातील आदरावर भर देत आहेत.

कोड शेअरिंग भागीदारीसंदर्भात भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत भागीदारी -

मुंबईतील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री पॅट्रिशिया डे लिले यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील नाते मजबूत करण्यासाठी संभाव्य कोड शेअरिंग भागीदारीसंदर्भात भारतातील सर्वोच्च एअरलाइन्ससोबत सकारात्मक चर्चा करणार असल्याचे सांगितले. दक्षिण आफ्रिका आयसीसी टी20 क्रिकेट वर्ल्ड कप 2027 आयोजित करण्यासाठी तयारी करत आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना आकर्षित करण्यासाठी या स्पर्धेचा लाभ घेऊन अनुभवावर आधारित प्रवासाची वाढती मागणी ते पूर्ण करणार आहेत. (हेही वाचा - Maternity Leave for Sex Workers: सेक्स वर्कर्सना प्रसूती रजा, आजारपणातही सुट्टी; बेल्जियममध्ये नवा रोजगार हक्क आणि संरक्षण कायदा)

दक्षिण आफ्रिकेकडून इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन (ईटीए) आणला जाणार असून त्यातून प्रवाशांना आपल्या व्हिसासाठी थेट अर्ज करता येईल. याशिवाय ट्रस्टेड टूर ऑपरेटर स्कीम (टीटीओएस) जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणार असून त्यामुळे ग्रुप व्हिसा अर्ज सुलभ होईल आणि प्रक्रिया कालावधी जलद होईल. सध्या एकूण पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या फक्त ३.९ टक्‍के आहे. त्यांचे ध्येय पुढील वर्षापर्यंत ही संख्या १० टक्‍के पर्यंत वाढवण्याचे आहे. दक्षिण आफ्रिकन मंत्र्यांना आशा आहे की, व्हिसा सुरू केल्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होईल आणि दोन्ही देशांमधील पर्यटनाचे नाते आणखी मजबूत होण्यास मदत होईल.

आपल्या भेटीबद्दल बोलताना मंत्री पॅट्रिशिया डे लिले म्हणाल्या की, भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील नाते इतिहासात खोलवर रूजलेले आहे. ही भेट महत्त्वाच्या क्षेत्रांमधील आमचा समन्वय सखोल करेल. ही भेट भारताच्या प्रवास व्यापार भागीदारांसोबत समन्वय करण्याची संधी असेल. त्यातून अर्थपूर्ण सांस्कृतिक आणि र्थिक देवाणघेवाणीला चालना देत असतानाच सुलभ व समृद्ध करणारा पर्यटनाचा प्रवास होऊ शकेल. भारतीय पर्यटक आमच्या पर्यटन क्षेत्राला एक वेगळा आयाम देतात. आम्ही दीर्घकालीन आठवणी निर्माण करत असतानाच दक्षिण आफ्रिकेचा आत्मा पाहण्यासाठी त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेला जोडण्यात पर्यटनाला असलेली महत्त्वाची भूमिका स्पष्ट करताना दक्षिण आफ्रिकन टुरिझम सीईओ नोम्बुलेलो गुलिवे म्हणाले की, भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान खोलवर कनेक्शन निर्माण करण्यात पर्यटन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आमच्या देशाचे अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य, बहुरंगी संस्कृती आणि हॉस्पिटॅलिटी यांचे प्रदर्शन घडवत असताना भारतीय पर्यटकांना दक्षिण आफ्रिकेत अद्भुत अनुभव घेण्यासाठी आम्ही प्रेरित करू शकू, अशी आशा आहे. आम्ही दक्षिण आफ्रिकेला भारतीय पर्यटकांसाठी पहिल्या क्रमांकाचे स्थान बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही त्यांना अविस्मरणीय ऐषारामी अनुभव तर देऊ इच्छितोच पण त्याचबरोबर साहस, वन्यजीव अनुभव आणि लक्झरी टुरिझमच्या संधीही देऊ इच्छितो. व्हिसा सुविधेतील नावीन्यपूर्णता आणि भारतीय टूर ऑपरेटर्ससोबतच्या भागीदारीमधील नावीन्यपूर्णतेद्वारे आम्ही दक्षिण आफ्रिकेला या वाढत्या बाजारपेठेत सहज पोहोचण्यायोग्य आणि आकर्षक बनवू इच्छितो. २०२३ हे वर्ष आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत भारतीय पर्यटकांची संख्या ४३ टक्‍क्‍यांनी वाढली.