एक काळ होता जेव्हा जिओनी (Gionee) कंपनी भारतातील अग्रगण्य स्मार्टफोन उत्पादक कंपनी होती. मात्र आता चीनच्या या स्मार्टफोन कंपनी जिओनीचे पूर्णपणे दिवाळे निघाले असून, कंपनी लवकरच आपली काही दुकाने बंद करण्याच्या तयारीत आहे. स्मार्टफोन विश्वातील ही एक महत्वाची कंपनी असून, कंपनीच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या गोष्टीला पूर्णतः जबाबदार आहेत या कंपनीचे चेअरमन. कारण हे चेअरमनमहाशय तब्बल $144 मिलिअन म्हणजेच 1008 करोड रुपये चक्क जुगारात हरले आहेत. यामुळेच कंपनी कर्जबाजारी झाली असून दिवाळखोरीकडे तिची वाटचाल सुरु असल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती इतकी डबघाईला आली आहे की, कंपनी तिच्या पुरवठादारांचेही पैसे देण्यास पूर्णतः असमर्थ ठरली आहे. याबाबत तब्बल 20 पुरवठादारांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यानंतर जेव्हा चौकशी झाली तेव्हा हे चेअरमन इतकी मोठी रक्कम जुगारात हरले असल्याचे समोर आले. लियू लिराँग (Liu Lirong) असे या चेअरमनचे नाव आहे. लियू लिराँग यांनी आपण जुगारात पैसे हरलो असल्याचे कबूल केले आहे, मात्र ते पैसे कंपनीचे नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. याचसोबत त्यांनी कंपनींच्या निधीमधून काही रक्कम घेतली असल्याचे कबूल केले आहे. यामुळेच आता कंपनीवर कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे.
भारतीय बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी जिओनीकडून भारतात 6.5 अब्ज रुपये गुंतवणूक होणार असल्याचे वृत्त एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झाले होते. भारतीय बाजारपेठेत पहिल्या पाच मोबाइल विक्रेत्यांमध्ये येण्याचे उद्दिष्ट कंपनीकडून निश्चित करण्यात आले होते. जिओनीने 'जिओनी एफ 205' आणि 'जिओनी एस 11' हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले होते. त्यावेळी जिओनीने तब्बल 4.6 टक्के भारतीय मार्केट काबीज केले होते.