Farmers' Protest: भारतामधील शेतकरी आंदोलनाचे लोण कॅनडापर्यंत; PM Justin Trudeau यांचा शेतकऱ्यांना पाठींबा, म्हणाले- 'परिस्थिती चिंताजनक आहे' (Watch Video)
Canada PM Justin Trudeau (Photo Credits: AFP)

सध्या भारतामध्ये कृषी कायद्याबाबत शेतकरी आंदोलन (Farmers' Protest) करत आहेत. देशाची राजधानी नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या या निदर्शानावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी या शेतकर्‍यांना पाठिंबा दर्शविला आहे. देशातील सुरू असलेल्या शेतकरी चळवळीबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ट्रुडो म्हणतात, 'कॅनडा शांततावादी निषेध करणार्‍यांच्या बचावासाठी नेहमीच त्यांच्या मागे उभा आहे'. यासह कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गुरु नानक देव यांच्या 551 व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन कार्यक्रमात हजेरी लावलेल्या ट्रूडो यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'भारतामधून शेतकरी आंदोलनाची बातमी येत आहे. ही परिस्थिती चिंताजनक आणि आम्ही आपल्या सर्व कुटुंबांबद्दल आणि मित्रांबद्दल काळजीत आहोत. शांततेत निदर्शने करण्याच्या अधिकाराच्या बचावासाठी कॅनडा नेहमीच सोबत उभा आहे. आम्ही एकमेकांशी बोलून तोडगा काढण्यावर बिश्वास ठेवतो. या संदर्भात आम्ही अनेक मार्गांनी आपल्या चिंता भारतासमोर मांडल्या आहेत. आपल्या सर्वांसाठीच एकमेकांना साथ देण्याचा हा क्षण आहे.’

जस्टिन ट्रूडो हे शेतकरी चळवळीवर प्रतिक्रिया देणारे पहिले परदेशी नेते ठरले आहेत. रविवारी, टोरोंटोमध्ये भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. याशिवाय ब्रिटनच्या लेबर पार्टीचे खासदार तनमनजीत सिंह धेसी यांनी ट्विट केले आहे की, ‘मी आमचे कुटुंब व मित्रांसह पंजाब आणि भारताच्या इतर भागातील शेतकऱ्यांसह आहे जे शांततेने आंदोलन करीत आहेत.’ (हेही वाचा: Farmers Protest: Sikhs For Justice संघटनेकडून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 10 लाख डॉलर्सची मदत जाहीर; एजन्सी झाल्या सतर्क)

दरम्यान, पंजाबसह अनेक राज्यातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर जमले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरु आहे. गेल्या काही वर्षातील शेतकऱ्यांचे हे सर्वात मोठे आंदोलन आहे. नवीन कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी त्यांना रामलीला मैदानावर जायचे आहे. गेल्या काही दिवसांत त्यांना रोखण्यासाठी हरियाणा आणि दिल्ली पोलिसांकडून अनेक प्रयत्न झाले. त्यांच्यावर थंड पाण्याचे वॉटर कॅनन्स आणि अश्रुधुराचे गोळेही फेकण्यात आले, यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत.’

मंगळवारी दुपारी तीन वाजता भारत सरकारने विज्ञान भवन येथे बैठकीसाठी शेतकरी संघटनांना बोलावले होते, परंतु त्याआधी पंजाब किसान संघर्ष समितीने बैठकीस उपस्थित न राहण्याचे संकेत दिले आहेत. या सभेत सर्व शेतकरी संघटनांना बोलवावे, असे समितीचे म्हणणे आहे.