Coronavirus: कोरोना व्हायरसच्या लढाईत ट्विटरचे सीईओ Jack Dorsey यांनी 28 टक्के संपती केली दान; जवळजवळ 7,500 कोटींची मदत
Twitter CEO Jack Dorsey. (Photo Credit: Getty Images)

मायक्रो-ब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग कंपनी ट्विटरचे (Twitter) सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी, कोरोना विषाणू (Coronavirus) विरूद्धच्या लढ्यात आर्थिक पाठिंबा जाहीर केला आहे. डोर्सी यांनी कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी जवळपास आपली 28 टक्के संपत्ती देऊ केली आहे. ट्विटरवर एक पोस्ट प्रसिद्ध करून त्यांनी याबाबत माहिती दिली. डोर्सी यांनी आपल्या संपत्तीमधील 28 टक्के वाटा स्टार्ट स्मॉल फाउंडेशनला दान केला आहे. हा संपूर्ण निधी कसा खर्च केला जाईल याबद्दल त्यांनी पुढे लिहिले आहे. तसेच ही महामारी संपुष्टात येताच, हा निधी मुलींच्या शिक्षणासाठी आणि आरोग्य सेवेसाठी वापरला जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

जॅक डोर्सी ट्वीट -

जॅक डोर्सी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्वीट केले आहे की, ते आपली 28% मालमत्ता, सुमारे 7,500 कोटी रुपये कोरोना व्हायरसच्या लढाईसाठी  देणार आहेत. महत्वाचे म्हणजे ही रक्कम कशी व कुठे खर्च होईल याबाबतचा सर्व तपशील पारदर्शक असणार आहे. जॅक डोर्सी यांनी दिलेल्या रकमेचा ट्रॅक ठेवण्यासाठी एक लिंक शेअर केली आहे, जिथे या पैशांबाबत सर्व प्रकारची माहिती आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी WHO सुद्धा दोषी? चीनच्या ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी)

जॅक डोर्सीच्या अगोदर जगातील तमाम मोठ्या कंपन्यांनी मदतीची घोषणा केली आहे. मार्क झुकरबर्गने कोरोनासाठी 227 कोटींची आर्थिक मदत केली आहे, आयफोन निर्माता कंपनी Apple ने इटलीमध्ये वैद्यकीय पुरवठा जाहीर केला आहे. याव्यतिरिक्त, Amazon चे संस्थापक जेफ बेझोस यांनीदेखील 100 दशलक्ष डॉलर्सची मदत केली आहे. दरम्यान, सध्या, सर्व विकसित देश वैद्यकीय उपकरणांच्या कमतरतेमुळे संकटांचा सामना करत आहेत. अगदी महासत्ता अमेरिकेतही व्हेंटिलेटर आणि संरक्षणात्मक उपकरणाची कमतरता आहे. अशा परिस्थितीमध्ये ही मदत लाखमोलाची ठरणार आहे.