
जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) शिरकाव केला आहे. एकीकडे चीनमधील कोरोना विषाणू संक्रमित लोकांची संख्या घटत आहे, तर दुसरीकडे चीनबाहेर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या आजारामुळे जगभरात 4,600 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. सध्याची गंभीर परिस्थिती पाहता जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) कोरोना विषाणूला ‘साथीचा आजार’ (Global Pandemic) जाहीर केला आहे. कोरोना विषाणूमुळे चीननंतर इटलीमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये 827 तर इराणमध्ये 354 लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात 1,26,273 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 4,633 लोकांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 3,169 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 80,796 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. नवीन पुष्टी झालेल्या प्रकरणांची घटती संख्या लक्षात घेता, चीनने 16 तात्पुरती रुग्णालये बंद केली आहेत. कोरोना संक्रमित रूग्णांवर आता कायमचे रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. इटली आणि इराणसह दक्षिण कोरियामध्येही कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 60 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 7755 लोक संक्रमित झाले आहेत.
(हेही वाचा: मुंबईतील शाळांना UNICEF यांच्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन)
कोरोनाचा संसर्ग हा चीनच्या बाहेर इटलीमध्ये सर्वाधिक वेगाने पसरत आहे. कोरोना विषाणूमुळे मृत्यूच्या बाबतीत इटली जगातील दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. इटलीनंतर इराणमध्ये सर्वात जास्त संक्रमित लोक व मृत्यू झालेली प्रकरणे आढळली आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 827 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर देशात या विषाणूमुळे संक्रमित झालेल्या लोकांची संख्या 12,462 वर पोहचली आहे. इराणमध्ये आतापर्यंत एकूण 354 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या इराणमध्ये 9,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 2,959 लोकांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. इराणमधील कोरोनामुळे मृत्यूच्या वाढत्या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर 70 हजार कैद्यांना तात्पुरते सोडण्यात आले आहे.