चिनी कंपनीची 'Unhappy Leave' पॉलिसी; काम करण्याची इच्छा नसल्यास मिळते १० दिवसांची सुट्टी, नेमक प्रकरण काय?
(Photo Credit: Pexels)

Beijing : सध्या धावपळीच्या जगात अनेक जण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. बऱ्याचदा काम करण्याची इच्छा नसतानाही फक्त सुट्टी नाही म्हणून लोक काम करतात. त्यातून अनेकदा त्यांच्या कामात चूका होताना दिसतात. परिणामी पूढे जाऊन कंपनीचेच नुकसान होते. त्यावर आता चीनमधील एका उद्योगपतीने कर्मचाऱ्यांसाठी अनहॅप्पी लिव्ह पॉलिसी काढली आहे. ज्यात कंपनीकडून कर्मचाऱ्यांना १० दिवसांची सुट्टी देण्यात येणार आहे. (हेही वाचा :Myanmar : म्यानमारमध्ये पारंपरिक नववर्षाच्या सुरूवातीची अनोखी प्रथा; 3,000 हून अधिक कैद्यांना दिली शिक्षेतून माफी)

चीनमधील हेनान प्रांतात उद्योगपती पँग डोंगलाई यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी अशी लिव्ह पॉलिसी तयार केली आहे. या लिव्ह पॉलिसीचे उद्दिष्ट एवढेच आहे की, कर्मचारी अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील. कर्मचारी कोणत्याही वेळी अतिरिक्त 10 दिवसांच्या रजेची विनंती करू शकतात. पंकनीकडून आधीच कर्मचाऱ्यांना वार्षिक 20 ते 40 दिवसांच्या रजा दिल्या जातात. त्या व्यतिरिक्त या रजा असणार आहेत.

“प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण असतात ज्यात त्या व्यक्तीला काम करण्याची इच्छा नसेत, काम करताना तो आनंदी नसतो, त्यामुळे तुम्ही आनंदी नसाल तर कामावर येऊ नका… ही रजा व्यवस्थापनाला नाकारता येणार नाही,” असे डोंगलाई यांनी म्हटले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताचे महत्त्व सांगताना पुढे म्हटले आहे की, “आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना निरोगी आणि आरामदाई जीवन मिळावे अशी इच्छा आहे, जेणेकरून कंपनीदेखील चांगेल काम करू शकेल…कर्मचाऱ्यांचे स्वातंत्र्य आणि प्रेम खूप महत्वाचे आहे, ते हिरावून आम्हाला मोठे व्हायचे नाही.”

डोंगलाई यांनी हा निर्णय 2021 च्या एका सर्वेक्षणावरून घेतला आहे. ज्यामध्ये असे दिसून आले होते की चीनमधील 65% पेक्षा जास्त कर्मचारी कामावर थकल्यासारखे किंवा नाखूष असल्याचे दिसून आले. डोंगलाई यांच्या या लिव्ह पॉलिसीचे वेइबो सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केवळ चीनमध्येच नव्हे तर जागतिक स्तरावर कौतुक करण्यात आले आहे. अनेकांनी डोंगलाई यांच्या या निर्णयाचे कौतूक केले आहे. डोंगलाई यांनी कामाच्या ठिकाणी चांगल्या वातावरण निर्मीतीसाठी याआधीही अनेक पाऊले उचलली आहेत. "कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम काम करायला लावणे हे अनैतिक आहे आणि त्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांच्या वाढीसाठी ते घातक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे."