Coronavirus च्या संकटात पाकिस्तानच्या मदतीला धावला चीन; 3 लाख मास्क, 10 हजार प्रोटेक्टीव्ह सूट व 4 मिलियन डॉलर्सची मदत
Coronavirus screening in Pakistan. (Photo Credit: ANI)

चीन (China) मधून उदयास आलेल्या कोरोना व्हायरस (Corona Virus) च्या संकटाचा सामना संपूर्ण जगाला करावा लागत आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत सुमारे 9000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अडीच लाखाहून अधिक लोक या विषाणूमुळे संक्रमित झाले आहेत. अशात पाकिस्तानमध्येही (Pakistan) या विषाणूने शिरकाव केला आहे. पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, या समस्येचा सामना करण्यासाठी चीन पाकिस्तानच्या मदतीला सरसावला आहे. पाकिस्तानचे राष्‍ट्रपति आरिफ अल्‍वी (Arif Alvi) हे चीनच्या दौऱ्यावर होते. यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीं आपण नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहू असे सांगितले.

पाकिस्तान सध्या कोरोनाच्या तावडीत सापडला आहे. देशात आतापर्यंत 304 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर दोन लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूची सुरुवात झाल्यानंतर अल्वी हे पहिले राष्ट्रप्रमुख आहेत, ज्यांनी चीनमध्ये इतका काळ व्यतीत केला. चीनमध्ये अल्वी यांच्यासाठी एका खास डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिनपिंग यांनी ‘हे दोन्ही देश जगासमोर असे एक मॉडेल सादर करतील, जे मानवतेच्या आणि समाजाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ठरेल’ असा विश्वास व्यक्त केला. (हेही वाचा: कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी 45 हजार कर्मचाऱ्यांना Facebook देणार 6 महिन्यांचा बोनस, जगभरातील अनेक देशांना करणार आर्थिक मदत)

जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचे अध्यक्ष अल्वी म्हणाले, ‘पाकिस्तान आणि चीनमधील मैत्री ऐतिहासिक आहे आणि दोन्ही देशातील लोक ती मनापासून पाळायचा प्रयत्न करतात.’ अशा प्रकारे बीजिंगकडून पाठिंबा मिळाल्यानंतर दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करार आणखी मजबूत झाला असल्याची भावनाही अल्वी यांनी व्यक्त केली. या भेटीचा मुख्य उद्देश चीनकडून मदत मिळवणे हा होता. चिनी माध्यमांनुसार, चीनकडून पाकिस्तानला लवकरच तीन दशलक्ष फेस मास्क, 10 हजार प्रोटेक्टीव्ह सूट व 4 मिलियन डॉलर्सची मदत मिळणार आहे.