ऑर्डर रद्द करून Delivery Boy ने लंपास केले तब्बल 14 iPhone 12 Pro Max; जाणून घ्या काय घडले पुढे
Apple (Image: PTI)

Apple चा नवीन फोन आयफोन 12 प्रो मॅक्स (iPhone 12 Pro Max) मॉडेल हे सध्या जगातील सर्वाधिक अपेक्षित अशा स्मार्टफोनंपैकी एक आहे. Apple कंपनीच्या उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या सर्वांनाच हा फोन आपल्या हातामध्ये हवा आहे. मीटूआन-डियानपिंग डिलिव्हरी (Meituan-Dianping Delivery) कंपनीत काम करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचीही अशीच इच्छा होती. मात्र Apple चे आयफोन महाग असतात, हे सर्वांनाच माहिती आहे. कदाचित म्हणूनच हा फोन मिळवण्यासाठी आयफोन 12 प्रो मॅक्सची डिलिव्हरी करणारा मुलगा तब्बल 14 फोन  घेऊन पळून गेला आहे.

कॅलिफोर्नियाच्या प्रीमियम टेक ब्रँड Apple ने लाँच केलेला आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल आयफोन 12 प्रो मॅक्स बाजारात दाखल झाला आहे. या डिव्हाइसची विक्री सुरू झाली आहे व हा फोन महाग असूनही, याला मोठी मागणी आहे. चीनच्या गुईझोऊ (Guizhou) प्रांताची राजधानी असलेल्या गुयांग (Guiyang) येथील Apple अधिकृत स्टोअरने टॅंग नावाच्या डिलिव्हरी बॉयला दुसर्‍या Apple स्टोअरमध्ये 14 नवीन आयफोन 12 प्रो मॅक्स युनिट वितरीत करण्यास सांगितले. मात्र हे युनिट्स वितरीत करण्याऐवजी ऑर्डर रद्द करून या मुलाने सर्वच्या सर्व 14 आयफोन 12 प्रो मॅक्स मॉडेल लंपास केले.

ही ऑर्डर 14 नोव्हेंबर रोजी देण्यात आली होती. Apple च्या कर्मचार्‍यांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी टॅंगला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 10 बंद आयफोन 12 प्रो मॅक्स बॉक्स हस्तगत केले गेले, उर्वरित चार बॉक्स उघडलेले होते. अहवालानुसार, टॅंगने कर्ज फेडण्यासाठी आपल्या मित्राला एक आयफोन 12 प्रो मॅक्स दिला. त्याच वेळी, एक बॉक्स स्वतःसाठी ठेऊन इतर 9,500 चिनी युआन म्हणजेच सुमारे 1,07,222 रुपये आणि 7,000 चिनी युआन म्हणजेच सुमारे 79,032 रुपयांना विकले. (हेही वाचा: Poco X3 स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची शानदार संधी, ग्राहकांना मिळणार दमदार ऑफर्स)

त्यानंतर विकल्या गेलेल्या आयफोनच्या पैशांमधून बीएमडब्ल्यू कार भाड्याने घेतली घेऊन ते फिरायला गेला. या कारचे भाडे दिवसाला 600 चिनी युआन होते. उर्वरित पैशातून त्याने स्वत: साठी महागडे कपडेही विकत घेतले. मात्र नंतर पोलिसांनी उर्वरित चार फोनही जप्त केले. आता Apple स्टोअरने टॅंगवर बंदी घालून त्याला नोटीस बजावली आहे.