China: ऐकावे ते नवलच! नाक आणि घशासोबतच Anal Swabs घेऊन होत आहे कोरोना विषाणूची चाचणी; देशातील तज्ञांनी केले कौतुक
COVID-19 Test (Photo Credits: Twitter)

जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाची तपासणी करण्यासाठी नाकातील स्वॅबचा वापर केला जात आहे. अनेक देश आतापर्यंत हीच पद्धत अवलंबत असताना दिसत आहे. मात्र आता या धोकादायक साथीचे उगमस्थान असणाऱ्या चीनमध्ये (China) कोरोनाच्या तपासासाठी दोन पावले पुढे जाऊन गुदाचे स्वॅब (Anal Swabs) वापरले जात आहेत. चीनमधील अनेक स्थानिक तज्ञांनीही या पद्धतीचे कौतुक केले असून याला अचूक चाचणी पद्धत म्हणून घोषित केले. कोरोनावर विजयाचा दावा करणारा चीन सध्या दुसर्‍या लाटेच्या संक्रमणाशी झुंजत आहे.

अमेरिकन मीडिया न्यूयॉर्क पोस्टने न्यूजवीकच्या हवाल्याने उद्धृत केले आहे की, ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवीन स्ट्रेन चीनपर्यंत पोहोचला आहे. ब्रिटनहून चीनमध्ये आलेल्या एका 9 वर्षाच्या मुलामध्ये हा स्ट्रेन आढळला होता. त्यानंतर या भागातील सर्व लोकांची पुन्हा चाचणी घेतली जात आहे. या अहवालानुसार, कोरोनाच्या तपासणीसाठी चीनमध्ये गेल्या वर्षीपासून Anal Swabs वापर केला जात होता. ही पद्धत मुख्यत: शांघायसारख्या कोरोना व्हायरस हॉटस्पॉट्स असलेल्या भागात वापरली जात आहे.

याव्यतिरिक्त, लोकांच्या घश्यातील आणि नाकातील नमुनेही घेतले जात आहेत, कारण Anal Swabs पेक्षा ती सोपी पद्धत आहे. न्यूजवीकच्या मते, बीजिंगमधील युआन हॉस्पिटलच्या (You'an Hospital) ली टोन्जेन्ग (Li Tongzeng) म्हणाले की, Anal Swabs घेणे हे अवघड आहे मात्र हे केवळ क्वारंटीन क्षेत्रातील लोकांची चाचणी घेण्यासाठी वापरले जात आहे. या पद्धतीमुळे चुकीच्या पद्धतीने सकारात्मक आलेल्या लोकांची संख्या कमी होऊ शकते. या तंत्रामुळे अगदी योग्य व ठोस पद्धतीने कोरोनाची ओळख पटवली जाईल. (हेही वाचा: कोरोना विषाणूबाबत WHO ने दिला धोक्याचा इशारा; लसीकरणानंतरही व्हायरसचा प्रसार चालूच राहणार)

डिसेंबर 2019 मध्ये वुहानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना घडल्यापासून देशात 88 हजाराहून अधिक लोक संक्रमित झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याच वेळी, संसर्गामुळे 4,600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशातील 5 कोटी लोकांना कोविड-19 ची लस देण्याचे चीनचे लक्ष्य आहे. दरम्यान, सरकारने चिनी नववर्षात लोकांना घरातच राहावे व बाहेर जाणे व प्रवास करणे टाळण्याची विनंती केली आहे.