2012 मध्ये झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कारानंतर, बलात्कार (Rape) करणार्यांना फाशी व नपुंसक बनवण्यासारखी अधिक कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभरात जोर धरू लागली होती. मात्र, सरकार आणि सिव्हील सोसायटीने असे कृत्य मानवतेविरूद्ध असल्याचे सांगत या गोष्टीला नकार दिला होता. भारतात सामूहिक बलात्कारासारख्या भयंकर गुन्ह्यासाठी जेल आणि काही प्रकरणांत मृत्यूदंडाची शिक्षा आहे. आता शेजारचा देश पाकिस्तानमध्ये (Pakistan) बलात्काराविरुद्ध नवीन कायदा करण्यात आला आहे, याला पंतप्रधान इम्रान खान (Prime Minister Imran Khan) यांनीही तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानुसार जर एखादी व्यक्ती बलात्काराच्या प्रकरणामध्ये दोषी आढळली तर, तिला शस्त्रक्रिया किंवा रासायनिक पद्धतीने नपुंसक (Chemical Castration) केले जाऊ शकते किंवा फाशी दिली जाऊ शकते.
मंगळवारी पाकिस्तानच्या माध्यमात प्रसिद्ध झालेल्या बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान इम्रान खान यांनी एका कायद्याला तत्वतः मौरी मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये बलात्काराच्या दोषीला रासायनिकदृष्ट्या नपुंसक बनवणे आणि लैंगिक छळ प्रकरणात त्वरित सुनावणीची तरतूद आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये कायदा मंत्रालयाने बलात्कारविरोधी अध्यादेशाचा मसुदा सादर केला. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
वृत्तानुसार, या मसुद्यामध्ये पोलीस व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणे, बलात्कार प्रकरणात त्वरित खटला चालवणे आणि साक्षीदारांचे संरक्षण यांचा समावेश होता. पंतप्रधान खान म्हणाले की, ‘ही गंभीर बाब आहे आणि या प्रकरणात होणारा विलंब खपवून घेतला जाणार नाही. आम्हाला आमच्या नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे लागेल.’ तसेच ते पुढे म्हणाले, ‘बलात्कार पीडित लोक न भीता तक्रारी नोंदवू शकतील आणि सरकार त्यांची ओळख लपवून ठेवेल.’ सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफचे सिनेट सदस्य फैसल जावेद खान म्हणाले की हा कायदा लवकरच संसदेत सादर केला जाईल. (हेही वाचा: महिलांवर बलात्कार करणा-यास नपुंसक करण्याचा 'या' देशाने घेतला निर्णय, तर 14 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणा-याला मिळणार 'ही' कठोर शिक्षा)
दरम्यान, पोलंड, इंडोनेशिया यांसारख्या देशांमध्ये तर, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, जॉर्जिया, आयोवा, लुईझियाना, माँटाना, ओरेगॉन, टेक्सास सारख्या प्रांतांमध्ये बलात्काराच्या दोषीला नपुंसकत्वाची शिक्षा दिली जाते.