Burger King Women's Day Post Controversy; महिलांविषयी केलेल्या ट्वीटवर 'बर्गर किंग'ने मागितली जाहीर माफी; ट्रोल झाल्यावर हटवले जुने Tweet, जाणून घ्या काय आहे प्रकरण
Burger King (Photo Credits: File Image)

8 मार्च रोजी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) साजरा करते. या दिवशी महिलांच्या कर्तुत्वाला सलाम केला जातो. मात्र याच महिला दिनी लोकप्रिय फूड चेन ‘बर्गर किंग’ने (Burger King) महिलांबाबत एक विवादित ट्वीट केले, ज्यामुळे कंपनीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आता बर्गर किंगने माफी मागत ते ट्वीट मागे घेतले आहे. ‘महिलांची जागा स्वयंपाकघरात’ असे हे ट्वीट होते, ज्यामुळे अनेकांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला होता. महिला दिनाच्या निमित्ताने बर्गरने स्वयंपाकाशी संबंधित शिष्यवृत्तीला चालना देण्यासाठी आणि त्यात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी हे ट्विट केले असल्याचे म्हटले आहे.

‘Women belong in the kitchen’ असे ट्वीट बर्गर किंगने केले होते. बर्गर किंगच्या या ट्विटवर लोक प्रचंड चिडले आणि त्यांनी कंपनीला ट्रोल करायला सुरुवात केली. कंपनीची मानसिकता महिलाविरोधी असल्याचे अनेकांनी म्हटले. आता बर्गर किंगने माफी मागितली आहे आणि आपले जुने ट्विट हटवले आहे.

बर्गर किंगने आपल्या नव्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'आम्ही तुमचा आवाज ऐकला आणि आमचे जुने ट्विट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. आम्ही मान्य करतो की आमचे ट्विट चुकीचे होते आणि त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. यूकेमध्ये आमच्या किचनमध्ये केवळ 20 टक्के व्यावसायिक महिला शेफ आहेत, व याकडेच लक्ष वेधण्याचे आमचे उद्दीष्ट होते. आम्हाला आमच्या किचनमध्ये महिला शेफची उपस्थिती वाढवायची आहे. आमच्या ट्वीटचा उद्देश या दिशेने लिंग गुणोत्तर सुधारणे हा होता. स्वयंपाकाशी संबंधित शिष्यवृत्ती देऊन हे गुणोत्तर बदलण्याचा आमचा मानस आहे.‘

स्पष्टीकरण देताना कंपनी म्हणाली की, ‘अमेरिकेसारख्या देशातही हॉटेल्समध्ये केवळ 24 टक्के महिला शेफ आहेत. महिला हेडशेफच्या बाबतीत हा आकडा 7 टक्के आहे. हीच वस्तुस्थिती आम्हाला बदलायची आहे.’ कंपनीने न्यूयॉर्क टाइम्सच्या आवृत्तीत त्यांच्या पाककलेशी संबंधित शिष्यवृत्तीची जाहिरात प्रकाशित केली आहे, ज्यात व्यावसायिक किचन आणि त्यातील महिलांच्या सहभागाबद्दल बोलले गेले आहे.