File image of Boris Johnson | (Photo Credits: Getty Images)

बोरिस जॉनसन (Boris Johnson) हे ब्रिटनच्या (UK) 250 वर्षांच्या इतिहासातील पहिले असे पंतप्रधान आहेत, ज्यांनी पदावर असताना पत्नीपासून घटस्फोट (Divorce) घेतला. बोरिस जॉनसन यांचा भारतीय वंशाच्या त्यांची माजी पत्नी मरीना व्हीलर (Marina Wheeler) यांच्यासोबतच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सप्टेंबर 2018 मध्ये, जॉनसन आणि व्हीलर यांनी एका स्टेटमेंटद्वारे पुष्टी केली होती की, लग्नाच्या 25 वर्षानंतर ते ‘कित्येक महिन्यांपूर्वी’ विभक्त झाले आहेत आणि घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये याबाबतची आर्थिक सेटलमेंट पूर्ण झाली. जॉनसन यांनी फेब्रुवारीमध्ये आपली प्रेयसी कॅरी सायमंड्स (Carrie Symonds) बरोबर एंगेजमेंट जाहीर केली होती.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जॉनसन यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता, त्यानंतर त्यांनी आपली प्रेयसी कॅरी सायमंड्सशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एका मुलाला जन्म दिला. घटस्फोटाचा अर्ज, त्यांचा मुलगा विल्फ्रेड लॉरी निकोलस जॉनसनचा जन्म 29 एप्रिल रोजी होण्यापूर्वी मंजूर झाला होता. पंतप्रधान जॉनसन आणि त्यांची पत्नी मरिना व्हीलर यांच्यात पैशांच्या वाटाघाटीचा करार फेब्रुवारीमध्ये लंडनच्या सेंट्रल फॅमिली कोर्टात झाला होता. या पैशांबाबत दोघांमध्ये वाद झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते, नंतर हे वाद मिटले. बोरिस जॉनसन आणि मरीना व्हीलर यांनी 1993 मध्ये लग्न केले होते आणि त्यांना चार मुले आहेत.

जॉनसन आणि व्हीलर यांच्यात चार दशलक्ष पौंड (भारतीय रुपयांमध्ये सुमारे 37 कोटी 44 लाख) रुपयांचा करार झाला आहे. जॉनसन यांचे 1987 मध्ये प्रथम अ‍ॅलेग्रा मोस्टिन ओवेन  (Allegra Mostyn-Owen) सोबत लग्न झाले होते आणि 1993 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता व्हीलरपासून घटस्फोट घेतल्यानंतर जॉन्सन हे 250 वर्षात पहिले ब्रिटिश पंतप्रधान बनले, ज्यांनी पदावर असताना पत्नीपासून घटस्फोट घेतला. यापूर्वी 1769 मध्ये ब्रिटीश पंतप्रधान ऑगस्टस फिटझरोय यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. (हेही वाचा: इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन डाउनिंग स्ट्रीट येथे करणार पुनरागमन; COVID-19 विरुद्ध यशस्वी लढा)

दरम्यान, मरीना व्हीलर यांचा जन्म, बीबीसी संवाददाता सर चार्ल्स व्हीलर आणि त्यांची दुसरी पत्नी दीप सिंग यांच्या पोटी झाला. दीप सिंग या भारतीय सिख होत्या. त्यांचे मूळ पूर्वज हे पश्चिम पंजाब, पाकिस्तानमधील सरगोधा गावचे. 1947 च्या भारत पाकिस्तान फाळणीनंतर ते भारतात परतले. अशाप्रकारे मरीना व्हीलर या अर्ध्या भारतीय आहेत. मरीना व्हीलर या ब्रिटिश वकील, लेखक आणि स्तंभलेखक आहेत. बॅरिस्टर म्हणून, त्या मानवी हक्कांसह सार्वजनिक कायद्यामध्ये निष्णात आहेत. त्या बार अनुशासनात्मक न्यायाधिकरणाच्या सदस्य आहेत. 2016 मध्ये त्यांची इंग्लंडच्या राणीचा सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती.