म्यानमार नॅशनल एअरलाइन्सवर गोळीबार (PC - Twitter)

Myanmar National Airlines: म्यानमारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाशात उडणाऱ्या विमानावर एका व्यक्तीने गोळीबार केला आणि विमानात बसलेल्या प्रवाशाला गोळी लागली. 'द सन' च्या वृत्तानुसार, म्यानमार नॅशनल एअरलाइन्सचे विमान 63 प्रवाशांना घेऊन लोईकाव (पूर्वेकडील काया राज्याची राजधानी) विमानतळावर उतरणार होते तेव्हा ही संपूर्ण घटना घडली. यादरम्यान एका व्यक्तीने विमानावर गोळीबार केला. त्यावेळी विमान सुमारे 3500 किमी उंचीवर उडत होते. आश्चर्य म्हणजे गोळी विमानात बसलेल्या प्रवाशाला लागली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेशी संबंधित छायाचित्रांमध्ये विमानाच्या बाहेरील थरात घुसून गोळी प्रवाशाला लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दुसरऱ्या फोटोत विमानात बसलेल्या प्रवाशाला गोळी लागल्याचेही दिसत आहे. तो कपड्याने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा -Indonesia Violence After Football Match: इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यानंतर स्टेडियममध्ये हिंसाचार, 127 ठार; 100 हून अधिक जखमी, Watch Video)

लोईकाव येथील म्यानमार नॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयाने सांगितले की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहेत. म्यानमारच्या लष्करी सरकारने बंडखोर गटावर विमानावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. परंतु, बंडखोर गटांनी हे आरोप नाकारले आहेत. म्यानमारच्या सत्ताधारी लष्करी परिषदेचे प्रवक्ते मेजर जनरल झॉ मिन तुन यांनी सांगितले की, "प्रवासी विमानावरील हल्ल्याचा हा प्रकार युद्धगुन्हा आहे. या घटनेचा निषेध केला पाहिजे."

दरम्यान, लष्कराने लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार उलथून टाकल्यानंतर आणि गेल्या वर्षी सत्ता काबीज केल्यानंतर काया राज्यात लष्कर आणि बंडखोर गटांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला होता.