मोठी दुर्घटना टळली! हवेत जवळ आले Air India आणि Nepal Airlines ची विमाने; एकमेकांना धडकणार इतक्यात...
Air India Flight (PC - Wikimedia Commons)

शुक्रवारी एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाशी निगडीत एक मोठा अपघात टळला. या दोन्ही विमानांची आकाशात मोठी टक्कर होणार होती, मात्र, वेळीच वॉर्निंग सिस्टमने वैमानिकांना सतर्क केले. त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने उचललेल्या पावलांमुळे अनर्थ टळला. अधिकाऱ्यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. घटनेनंतर नेपाळ नागरी विमान वाहतूक प्राधिकरण (Civil Aviation Authority of Nepal) चे प्रवक्ते जगन्नाथ निरौला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएएएनने हवाई वाहतूक नियंत्रण विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना ‘निष्काळजीपणासाठी’ निलंबित केले आहे.

माहितीनुसार, क्वालालंपूर, मलेशियाहून काठमांडूला येणारे नेपाळ एअरलाइन्सचे विमान आणि नवी दिल्लीहून काठमांडूला येणारे एअर इंडियाचे विमान शुक्रवारी सकाळी जवळपास एकमेकांना धडकणार होते. निरौला यांनी सांगितले की, एअर इंडियाचे विमान 19,000 फुटांवरून खाली उतरत होते, तर नेपाळ एअरलाइन्सचे विमान त्याच ठिकाणी 15,000 फूट उंचीवर उडत होते. रडारने दोन्ही विमाने जवळ असल्याचे दाखवल्यानंतर नेपाळ एअरलाइन्सचे विमान 7,000 फूट खाली उतरले.

(हेही वाचा: कोचीमध्ये ALH ध्रुव हेलिकॉप्टर क्रॅश; सर्व कर्मचारी सुरक्षित, भारतीय तटरक्षक दलाकडून चौकशीचे आदेश)

अशाप्रकारे एक मोठा अपघात टळल्यानंतर नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. अद्याप याबाबत एअर इंडियाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्स यांच्यात नुकत्याच झालेल्या या घटनेच्या पार्श्वभुमीवर त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रकाला पुढील आदेशापर्यंत पदावरून हटवण्यात आले आहे. नेपाळच्या नागरी विमान वाहतूक विभागाने ही कारवाई केली आहे.