धक्कादायक! तब्बल 19 लोकांशी लग्न करून महिलेने घातला 2 कोटींपेक्षा जास्त रुपयांना गंडा; समोर आला मोठा Marriage Scam
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सर्वसाधारणपणे जेव्हा कोणतीही व्यक्ती आपल्या लग्नाचा व्हिडीओ पाहते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आठवणींचे गोड हसू जमा होते. मात्र चीनच्या (China) एका व्यक्तीला आपल्या बायोकोच्या लग्नाचा व्हिडीओ पाहून आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्या व्हिडीओमध्ये ही त्याची पत्नी चक्क दुसऱ्याच कोणाच्यातरी गळ्यात माळ घालत होती. सध्या चीनमध्ये याच महिलेची चर्चा आहे. या महिलेने एक नाही, दोन नाही... तब्बल 19 जणांना पैशांसाठी गंडा घातला आहे. मुलाकडून मिळणारा हुंडारुपी पैसा घेण्यासाठी या महिलेने 19 जणांशी लग्न केले. अखेर तिचे पितळ उघड पडलेच.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या म्हणण्यानुसार, या महिलेने 19 लोकांसोबत विवाह घोटाळा (Marriage Scam) केला आहे. त्याद्वारे तिने आतापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांच्या व्हिचॅट ​​पोस्टच्या म्हणण्यानुसार, मार्च महिन्यात एक व्यक्ती लाईव्ह स्ट्रीमिंग एप्लिकेशनवर एक व्हिडिओ पहात होती, ज्यामध्ये एक महिला जवळच्या गावात राहणाऱ्या व्यक्तीशी लग्न करत होती. हे लग्न पाहून या 35 वर्षे व्यक्तीला धक्काच बसला कारण ती महिला त्याची पत्नी होती.

त्यानंतर या व्यक्तीने आपल्या कुटूंबासह महिलेचा व तिच्या नव्या नवऱ्याच्या कुटुंबाचा शोध घेतला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर चौकशीअंती महिलेचे खरे रूप समोर आले. अहवालानुसार, या महिलेच्या जाळ्यात सापडलेले बहुतेक पीडित पुरुष ग्रामीण भागातील असून त्यांना लग्नासाठी मुली मिळत नव्हत्या. अशा प्रकारे या महिलेने आतापर्यंत 2.28 कोटी रुपये जमा केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला गांसु प्रांताची आहे. मॅचमेकरच्या मदतीने महिलेची इतर लोकांशी भेट झाली. लग्नानंतर काही दिवसांनी या महिलेने सतत घराबाहेर राहणे सुरु केले. अनेक सबबी सांगून ती घराबाहेर राहत असे व इतर लोकांना फसवत असे. आता ही महिला आणि तिच्या तिन्ही साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की ही महिला लग्नानंतर दोन महिन्यांत केवळ 10 दिवसच आपल्या पतीच्या घरी राहिली होती.