Cargo Ship Fire (PC - Twitter/@mtkblb)

Cargo Ship Fire: नेदरलँड्सच्या किनारपट्टीवर सुमारे 3,000 कार घेऊन जाणाऱ्या मालवाहू जहाजाला (Cargo Ship) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. या अपघातात एका भारतीयाचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. अपघातात जीव गमावलेला भारतीय जहाजाचा क्रू मेंबर होता. डच तटरक्षक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, 199 मीटर लांब पनामानियन मालवाहू जहाज फ्रीमँटल हायवे जर्मनी ते इजिप्तला जात होते. परंतु मंगळवारी रात्री नेदरलँडच्या किनार्‍याजवळ जहाजाला आग लागली. या अपघातात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती नेदरलँडमधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

दूतावासाने सांगितले की, ते मृतांच्या नातेवाईकांच्या संपर्कात असून लवकरच मृतदेह भारतात पाठवला जाईल. ते अपघातात जखमी झालेल्या 20 लोकांच्या संपर्कात आहेत आणि त्यांना मालवाहू जहाज चालवणाऱ्या कंपनीशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत दिली जात आहे. (हेही वाचा - Hells Kitchen collapsed In New York: गगनचुंबी इमारतीवरुन क्रेन कोसळले, पाहा व्हिडिओ)

डच बेट एमलँडपासून 27 किमी अंतरावर असलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ द वेडन सीजवळ हा अपघात झाला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण जगभरातील स्थलांतरित पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. अपघाताच्या छायाचित्रांमध्ये जहाजातून धूर निघताना दिसत आहे. अग्निशमन विभागाचे जवान आग विझवण्यात गुंतले आहेत, मात्र 16 तास उलटूनही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही.

आग विझवण्यास अजून काही दिवस लागतील असे सांगण्यात येत आहे. कारण, अग्निशमन दलाचे जवान जहाजावर चढू शकले नसून पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जहाजात जास्त पाणी भरल्याने ते बुडण्याचाही धोका आहे. यामुळेच आग विझवणे अत्यंत आव्हानात्मक आहे.