Pakistan Earthquake: पाकिस्तानातील हरनाईमध्ये 6.0 रिश्टर स्केलचा भूकंप, 20 जणांचा मृत्यू
Earthquake (Photo Credits: Pixabay)

दक्षिण पाकिस्तानमधील (South Pakistan) हरनाई (Harnai) भागात गुरुवारी भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.0 मोजण्यात आली. या भूकंपात किमान 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानमधील भूकंप इतका शक्तिशाली होता की त्याचा परिणाम शेजारील अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानमध्ये दिसून आला. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचेही वृत्त आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, आज सकाळी 3.30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.  भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे 20 किलोमीटर खोलीवर होता. हरनाई पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये येते. भूकंपाच्या जोरदार हादऱ्यांमुळे अनेक घरांचेही नुकसान झाले. त्याची तीव्रता खूप वेगवान होती आणि नुकसानीची बाब अनेक लगतच्या जिल्ह्यांमध्ये समोर येत आहे.

प्रांतीय सरकारचे वरिष्ठ अधिकारी सुहेल अन्वर हाश्मी यांनी सांगितले की, छत आणि भिंती कोसळून अनेक लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक महिला आणि सहा मुलांचाही समावेश आहे. लोकांना मदत आणि बचाव करण्यासाठी क्वेट्टा येथून अवजड यंत्रसामग्री रवाना करण्यात आली आहे. सध्या हरणाई येथील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. हेही वाचा China Warns World War Three: चीन आणि तैवानमधील तणाव वाढला; ड्रॅगनने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी, जाणून घ्या सविस्तर

ट्वीट-

पाकिस्तानी माध्यमांकडून येणाऱ्या व्हिज्युअल्सनुसार, हरनाईतील रुग्णालयांमध्ये वीज नाही. तेथे जखमी लोकांचे नातेवाईक मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाने उपचार घेत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, भूकंपाचा प्रभाव अनेक जिल्ह्यांमध्ये आहे, त्यामुळे जखमींची नेमकी संख्या सांगणे शक्य नाही. भूकंपानंतर, सोशल मीडियावर अनेक चित्रे समोर आली आहेत. भूकंपाच्या धक्क्यानंतर लोक रस्त्यावर येताना दिसत आहेत. भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर पाकिस्तानमध्ये मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.