Yahoo चा मोठा निर्णय; भारतामध्ये Yahoo News, Yahoo Cricket, MAKERS सह अनेक सेवा झाल्या बंद
Yahoo | Representational Image

अमेरिकन वेब सर्व्हिस प्रोव्हायडर ‘याहू’ने (Yahoo) 26 ऑगस्टपासून भारतात न्यूज ऑपरेशन्स बंद केले आहे. याहूने त्यांच्या सर्व न्यूज साइट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, याचे कारण म्हणजे एफडीआय लिमिट हे आहे. विद्यमान नियमांनुसार, भारतातील कोणत्याही माध्यमांमध्ये 26 टक्क्यांपेक्षा जास्त विदेशी गुंतवणुकीस परवानगी नाही. आता कंपनी गुरुवारपासून कोणताही नवीन कंटेंट प्रकाशित करणार नाही. याहू क्रिकेट, याहू फायनान्स, न्यूज आणि एंटरटेनमेंटच्या सर्व साइट्स बंद राहतील. मात्र या शटडाउनचा याहू मेलवर परिणाम होणार नाही.

वेरायझन मीडियाचे ग्लोबल पब्लिक पॉलिसी हेड एप्रिल बॉयड म्हणाले की, ‘भारतात बातम्या आणि चालू घडामोडी विभागात कार्यरत असलेल्या मीडिया कंपन्यांसाठी विदेशी गुंतवणुकीच्या मर्यादेत बदल झाला आहे. हा बदल अशा डिजिटल मीडिया कंपन्यांनाही लागू होईल, जे बातम्या अपलोड करतात किंवा न्यूज एग्रीगेटर म्हणून काम करतात.’ ते पुढे म्हणाले की, 'आमच्या बातम्या आणि चालू घडामोडीच्या कंटेंट व्यवसायासाठी सरकारकडून आवश्यक परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे आम्हाला भारतात याहूच्या सर्व साइट्स बंद कराव्या लागतील.'

एफडीआयच्या नवीन नियमांनुसार, भारतातील डिजिटल कंपन्यांमध्ये 26 टक्के पेक्षा जास्त परकीय गुंतवणूक केली जाऊ शकते मात्र यासाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे. नवीन FDI नियम ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहे. सध्या याहू न्यूज जरी बंद झाले असले तरी, याहू मेल आणि याहू सर्च देशात सुरु राहील. (हेही वाचा: Free WiFi वापरायचे आहे? तर 'या' सोप्प्या ट्रिक्सचा वापर करा)

अमेरिकन टेक आणि टेलिकम्युनिकेशन कंपनी वेरायझनने 2017 मध्ये याहूचे अधिग्रहण केले होते. वेब पोर्टलने आपल्या वापरकर्त्यांना आश्वासन दिले की त्यांचे याहू खाते, ई-मेल आणि सर्च अनुभवावर याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही.