World's Fastest Internet: चीनने लाँच केले जगातील सर्वात वेगवान इंटरनेट; अवघ्या एका सेकंदात डाउनलोड होतील 150 चित्रपट
Internet (PC - @ians_india)

चीनने (China) इंटरनेटच्या (Internet) क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली आहे. चिनी कंपन्यांनी जगातील सर्वात वेगवान इंटरनेट नेटवर्क (World's Fastest Internet) सुरू केले आहे. हा प्रकल्प सिंघुआ विद्यापीठ, चायना मोबाईल, हुआवेई टेक्नॉलॉजीज आणि सर्नेट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने पूर्ण झाला आहे. त्यांचा दावा आहे की लॉन्च केलेले इंटरनेट प्रति सेकंद 1.2 टेराबिट डेटा ट्रान्समिट करू शकते.

हा इंटरनेट स्पीड सध्या अस्तित्वात असलेल्या प्रमुख इंटरनेट मार्गांपेक्षा दहापट जास्त आहे. 2025 मध्ये चीन हा इंटरनेट स्पीड मिळवू शकेल असा अंदाज होता, मात्र चीनने वेळेपूर्वीच हे यश मिळवले आहे.

या इंटरनेट स्पीडद्वारे एका सेकंदात 150 हून अधिक चित्रपट डाउनलोड करता येतात. चीनचे नवीन बॅकबोन नेटवर्क हे देशातील प्रमुख शहरांना जोडणारा डेटा महामार्ग आहे. 3,000 किलोमीटरहून अधिक पसरलेले हे नेटवर्क, एका विस्तृत ऑप्टिकल फायबर केबलिंग प्रणालीद्वारे बीजिंग, वुहान आणि ग्वांगझूला जोडते. ज्याचा वेग 1.2 टेराबिट प्रति सेकंद म्हणजेच 1,200 गीगाबिट इतका आहे.

जगातील बहुतांश इंटरनेट बॅकबोन नेटवर्क केवळ 100 गिगाबिट्स प्रति सेकंद वेगाने कार्य करतात. यूएसने अलीकडेच 400 गीगाबिट प्रति सेकंद या वेगाने इंटरनेट2 चे फिफ्त जनरेशन पूर्ण केले. मात्र चीनचे हे नेट अमेरिकेच्या पाचव्या पिढीच्या नेटपेक्षा खूप पुढे आहे. चीनच्या तीन प्रमुख शहरांमधील, महत्त्वाकांक्षी बीजिंग-वुहान-ग्वांगझू कनेक्शन हा भविष्यातील इंटरनेट तंत्रज्ञान पायाभूत सुविधांचा एक भाग आहे. (हेही वाचा: Tech Layoffs मुळे सणासुदीच्या उत्साहावर विरजण; Google, Amazon, Snap सह अनेक कंपन्यांमध्ये नव्याने नोकरकपात)

नेटवर्कने सर्व ऑपरेशनल चाचण्या उत्तीर्ण केल्या आणि विश्वासार्हपणे कामगिरी केली. नेटवर्क खरोखर किती वेगवान आहे हे समजून घेण्यासाठी, हुआवेई टेक्नॉलॉजीजचे (Huawei Technologies) चे उपाध्यक्ष वांग लेई (Wang Lei) यांनी स्पष्ट केले की, या नेटद्वारे फक्त एका सेकंदात 150 हाय-डेफिनिशन चित्रपटांइतका डेटा हस्तांतरित केला जाऊ शकतो. चीन लवकरच या हायस्पीड इंटरनेट सेवेचा देशाच्या इतर भागांमध्येही विस्तार करणार आहे.