WOLOO App: जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करुन देणारे 'वुलू' अ‍ॅप लॉन्च; जाणून घ्या कशी मिळणार मदत
Women and Child Development Minister, Yashomati Thakur (PC - Twitter)

जागतिक महिला दिनानिमित्त (International Women's Day) आज अनेक महिला उपयोगी घोषण व गोष्टी करण्यात आल्या. या दिवसाचे औचित्य साधून महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या ‘वुलू’ (WOLOO) ॲपचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. हे ॲप अतिशय नाविन्यपूर्ण असून महिलांच्या उपयोगी येणार असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या शासकीय निवासस्थानी या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री ॲड.ठाकूर यांच्या विशेष सूचनेनुसार खासगी कंपनीने या ॲपची निर्मिती केली आहे.

वुलू या ॲपद्वारे शासकीय महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रारंभी मुंबईतील 1500 हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या प्रसाधनगृहांचा ‍वापर करता येणार आहे. हे ॲप विनामुल्य असून महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित प्रसाधनगृहांची उपलब्धता करुन देणार आहे. राज्यात महिलांसाठीच्या स्वच्छ प्रसाधानगृहांअभावी अनेकवेळा महिलांची गैरसोय होते. सुरुवातीला शासकीय महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना हे ॲप विनामूल्य वापरता येणार असून सर्वसामान्य महिलांसाठी 99 रुपये प्रतीमाह सबस्क्रिप्शन घेऊन वापर करता येणार आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोरवर सहजरित्या उपलब्ध करुन देण्यात आले आहे. (हेही वाचा: भारतात दररोज लैंगिक अत्याचार होत असलेल्या 4 मुलांना न्याय मिळत नाही; KSCF च्या अहवालात धक्कादायक खुलासा)

वुलू ॲपने प्रमाणित केलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या प्रसाधनगृहांची यादी या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, काल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी 'हर सर्कल' (Her Circle) सुरू करण्याची घोषणा केली. 'हर सर्कल' हा एक प्रेरणादायक आणि सर्वसमावेशक कंटेंट, सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या व्यासपीठाचा सोशल नेटवर्किंगचा भाग केवळ महिलांसाठी असेल तर व्हिडिओ आणि लेख हे सर्वांसाठी असेल.