WhatsApp New Feature: आता अनोळखी लोक तुमचे Last Seen आणि Online Status पाहू शकणार नाहीत; लवकरच येत आहे नवीन फिचर, घ्या जाणून
WhatsApp (Photo Credit: File/PTI)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे फार पूर्वीपासून सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप्लिकेशन आहे. परंतु कधीकधी वापरकर्त्याचा मागोवा घेण्यासाठीसुद्धा याचा उपयोग केला जातो. वापरकर्त्याचे लास्ट सीन आणि ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटी पाहण्यासाठी प्लेस्टोअरवर अनेक थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्स आहेत. आता मेटा-मालकीचे WhatsApp हे अज्ञात वापरकर्त्यांना तुमचे लास्ट सीन आणि ऑनलाइन स्थिती तपासण्यापासून रोखण्यासाठी नवीन प्रायव्हसी संदर्भात काही उपाययोजना करीत आहे. ही माहिती WABetaInfo ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे.

WABetaInfo च्या मते, ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाही आणि ज्यांच्याशी चॅट केलेले नाही असे लोक WhatsApp या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर तुमचे लास्ट सीन आणि तुम्ही ऑनलाईन आहात का नाही, ही गोष्ट पाहू शकणार नाहीत. Google Play Store किंवा App Store वर असलेल्या अनेक थर्ड पार्टी अॅप्सद्वारे निवडक संपर्कांचे लास्ट सीन आणि ऑनलाइन स्थिती तपासणे शक्य आहे. अनेक वापरकर्ते आणि हॅकर्स अशा अॅप्सचा वापर करतात. आता अशा अॅक्टिव्हिटी थांबवण्यासाठी व्हॉट्सअॅप नवीन प्रायव्हसी फीचर सुरू करत आहे. (हेही वाचा: Facebook, Instagram आणि WhatsApp वापरण्यासंबंधित बदलले नियम, जाणून घ्या अधिक)

या नवीन फिचरनुसार, तुम्ही एखाद्या WhatsApp खात्याशी कधीही चॅट केले नसल्यास तसेच थर्ड पार्टी अॅप्ससोबत तुमच्या खात्याची कोणतीही हिस्टरी नसेल, तर असे लोक तुमचे लास्ट सीन आणि ऑनलाइन स्थिती पाहू शकणार नाहीत. या फिचरचा तुम्ही आणि तुमचे मित्र, कुटुंब आणि व्यवसाय किंवा ज्यांना तुम्ही ओळखत आहात, ज्यांच्याशी तुमचे यापूर्वी मेसेजद्वारे बोलणे झाले आहे यांच्यावर काही परिणाम होणार नाही. त्यामुळे हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर का तुम्ही भविष्यात काही लोकांचे लास्ट सीन पाहू शकला नाहीत, तर कदाचित त्यांनी 'My Contacts Except' हे फिचर सक्षम केले असेल, असे समजावे.