Artificial Intelligence | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

UN On AI Resolution: संयुक्त राष्ट्र (United Nations) महासभेने गुरुवारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर सादर केलेला पहिला ठराव स्वीकारला. यामुळे नवीन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना बळ मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे मानवी जीवन अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यास मदत होईल. अमेरिकेने महासभेत AI शी संबंधित ठराव मांडला आणि तो मतदानाशिवाय मान्य करण्यात आला. याचा अर्थ या प्रस्तावाला महासभेच्या सर्व 193 सदस्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळाला. हा प्रस्ताव आणण्याच्या तयारीदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन म्हणाले होते की, एआयच्या सुरक्षित वापरासाठी संयुक्त राष्ट्राच्या ठरावाद्वारे एक ऐतिहासिक पाऊल उचलले जाईल.

या ठरावात AI च्या वापराच्या अटी व शर्ती स्पष्ट करण्यात आल्या आहेत. AI चा वापर मानवतेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. परंतु, त्याचे काही मोठे दुष्परिणाम देखील आहेत. पारित केलेल्या प्रस्तावात हे फायदे मिळवण्यासाठी आणि दुष्परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. महासभेने AI तंत्रज्ञानाला श्रीमंत आणि गरीब विकसनशील देशांमधील सहभागासाठी प्रभावी माध्यम बनवण्याचा संकल्प केला. AI द्वारे आंतरराष्ट्रीय कल्याणासाठी योजना बनवताना, दोन्ही श्रेणीतील देश एकाच मंचावर असतील. विकसनशील देशांना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. जेणेकरून ते त्यांचे विकास उद्दिष्ट साध्य करू शकतील. (वाचा - World’s First AI Software Engineer: कॉग्निशनने लॉन्च केला जगातील पहिला एआय इंजिनीअर; लिहू शकतो कोड, बनवू शकतो सॉफ्टवेअर)

एआयच्या वापराचे अनेक फायदे -

एआयच्या वापराने अनेक प्रकारचे रोग शोधले जाऊ शकतात. पुराच्या तीव्रतेचा आधीच अंदाज लावता येतो. यामुळे नैसर्गिक कारणांमुळे होणारे नुकसान टाळण्यात आणि कुशल कर्मचारी तयार करण्यात मदत होईल. महासभेने हा प्रस्ताव स्वीकारून तपशीलवार आणि स्पष्ट नियम बनवल्याने, जगातील AI संबंधित उपक्रमांच्या विकासाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या वापराचे नियोजन करण्यासाठी आता देशांना मदत मिळणार आहे. (वाचा - AI Will Make Work Easier: 59 टक्के भारतीयांचा एआय काम सोपे करेल, परिणाम चांगले देईल असा विश्वास: अहवाल)

AI चा वापर प्रशासनामध्ये केला जाऊ शकतो -

आता प्रशासनात AI चा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याद्वारे जागतिक संपर्क प्रणाली आणि कार्यप्रणाली तयार करता येईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या एआयच्या वापरासाठी नियमांची गरज असल्याचे अनेक दिवसांपासून सांगत होत्या. आता त्यांना काम करणे सोपे होणार आहे. युरोपियन युनियनच्या संसदेने 13 मार्च रोजी AI च्या वापरासाठीच्या नियमांना मंजुरी दिली आहे.