Elon Musk | (PC - Twitter)

Elon Musk Package: टेस्लाच्या भागधारकांनी अनेक महिन्यांनंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलोन मस्क (Elon Musk) यांच्या अब्ज डॉलरच्या वेतन पॅकेजला पुन्हा मान्यता दिली आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, टेस्लाच्या भागधारकांनी मस्क यांना $ 56 अब्ज (सुमारे 4,678 अब्ज रुपये) वेतन पॅकेज देण्याच्या बाजूने मतदान केले आहे. मात्र, हे वेतन पॅकेज मिळण्यासाठी मस्क यांच्या मार्गात अजूनही अडथळा आहे.

मस्कचे $56 अब्ज वेतन पॅकेज डेलावेअर कोर्टाने आधीच नाकारले होते, परंतु ते अवैध ठरवल्यानंतरही भागधारकांनी पॅकेज मंजूर केले. मात्र, जरी भागधारकांनी मस्कचे वेतन पॅकेज मंजूर केले असले तरी, त्याच्या पेमेंटसाठी प्रथम न्यायालयाची मंजुरी आवश्यक आहे. टेस्लाचे वकील आता न्यायालयात न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करतील की, पगार गुंतवणूकदारांनी मंजूर केला आहे. (हेही वाचा -Elon Musk Accuses WhatsApp: 'व्हॉट्सॲप दररोज रात्री वापरकर्त्यांचा डेटा एक्स्पोर्ट करते'; एलॉन मस्क यांचा खळबळजनक आरोप)

हे वेतन पॅकेज टेस्लाच्या भागधारकांनी बऱ्याच काळापासून मंजूर केले नव्हते. मस्क यांनी भागधारकांना धमकी दिली होती की, जर त्यांना पगाराचे पॅकेज मंजूर केले नाही तर ते कंपनीचे सीईओ पद सोडतील. टेस्ला भागधारकांची वार्षिक सर्वसाधारण सभा 13 जून रोजी झाली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, एलोन मस्कच्या वेतन पॅकेजचा प्रस्ताव एजीएममध्ये भागधारकांसमोर आला आणि त्यांनी त्याच्या बाजूने मतदान केले. याशिवाय, कंपनीची नोंदणी टेक्सासमध्ये स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावालाही भागधारकांनी मंजुरी दिली. (वाचा -Twitter's Domain Name Changed: Elon Musk यांनी बदलले ट्विटरचे डोमेन नाव; आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फक्त x.com वर उघडणार)

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून इलॉन मस्क यांना मिळालेल्या पेमेंटचा वर्षानुवर्षे चाललेला वाद आता मिटण्याची शक्यता आहे. टेस्लामधील इलॉन मस्कसाठी $56 अब्जच्या वेतन पॅकेजचा प्रस्ताव 2018 मध्येच तयार करण्यात आला होता, परंतु तो अद्याप मंजूर झाला नव्हता. कंपनीच्या गुंतवणूकदारांचा एक गट या मोठ्या पॅकेजला विरोध करत होता. इलॉन मस्क यांनी टेस्लामधील त्यांच्या पॅकेजबाबत स्पष्ट मागणी केली होती. त्यांनी सांगितले होते की, जर त्यांना टेस्लामध्ये किमान 25 टक्के हिस्सेदारी मिळाली नाही तर ते कंपनी सोडण्याचा विचार करू शकतात. सध्या मस्कची टेस्लामध्ये सुमारे 13 टक्के भागीदारी आहे. त्यांच्या मागण्यांचा विचार करून कंपनीच्या व्यवस्थापनाने $56 अब्जचे पॅकेज तयार केले होते.