UPI ATM Transactions: आता ग्राहक डेबिट आणि क्रेडिट कार्डशिवाय ATM मधून काढू शकणार पैसे; जाणून घ्या कसे
ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

बर्‍याच वेळा घरातून गडबडीने बाहेर पडताना आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड (Credit and Debit Card) घेणे विसरतो. ज्या दिवशी काहीतरी महत्वाचे काम असते नेमकी त्याच दिवशी ही गोष्ट घडते आणि मग आपल्याला पुढील समस्यांना सामोरे जावे लागते. याच बाबतीत एक चांगली बातमी समोर येत आहे. लवकरच ग्राहक युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या माध्यमातून, एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन) वर पैसे काढणे शक्य होणार आहे. इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना ही मोठी भेट देऊन ठराविक एटीएममध्ये यापूर्वीच ही सेवा सुरू केली आहे.

बँक ऑफ इंडिया ही सुविधा देशभरातील सर्व एटीएममध्ये लागू करण्याच्या तयारीत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या मते, यूपीआय कामकाज सांभाळणारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ही सुविधा इतर बँकांसाठीही सुरु करू इच्छीते. इतर बँकांसमवेत ‘इंटरऑपरेबिलिटी गाइडलाइन्स’ चा आढावा घेण्यासाठी एक समिती देखील स्थापित केली आहे.

(हेही वाचा: UPI च्या माध्यमातून पैसे पाठवताना 'या' पद्धतीने काळजी घ्या, नाहीतर फसवणूक होईल)

असे काढू शकता पैसे - 

एटीएमवर गतिशील क्यूआर (क्विक रिस्पॉन्स) कोड फ्लॅश होईल, ज्यायोगे ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय पैसे काढता येतील. या वेळी ग्राहकांना गुगलपे, फोनपे, भीम आणि पेटीएम सारख्या कोणत्याही यूपीआय अॅपचा वापर करून, क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल त्यानंतर ते पैसे काढू शकतील.

यूपीआय ही भारतातील पेमेंटची सर्वात लोकप्रिय पद्धत बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2019 मध्ये यूपीआयने 100 कोटी व्यवहाराचा टप्पा पार केला होता.