2021 या वर्षातलं शेवटचं ग्रहण यंदा 4 डिसेंबरला होणार आहे. 4 डिसेंबरचं ग्रहण हे सूर्यग्रहण (Surya Grahan) असणार आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. पृथ्वीवर चंद्राची सावली पडते त्यावेळच्या खगोलीय स्थितीला सूर्यग्रहण म्हटलं जातं. सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला गेला असेल तर ते खग्रास सूर्यग्रहण असते आणि सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळते. शनिवार 4 डिसेंबरला होणारं सूर्यग्रहण हे भारतामधून दिसणार नाही पण अंटार्टिका किंवा दक्षिण गोलार्ध मधील भागात असलेल्या काही प्रदेशांमधून पाहता येणार आहे. मग भारतीयांना यंदाच्या अखेरच्या सूर्यग्रहणाचा आनंद घ्यायचा असल्यास तो नेमका कसा, कुठे घेऊ शकता? हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर पहा या सूर्यग्रहणाची भारतामधील वेळ, ऑनलाईन ग्रहण कुठे पाहू शकाल?
नासा ने दिलेल्या माहितीनुसार 4 डिसेंबरचं सूर्यग्रहण काही ठिकाणी पूर्ण तर काही ठिकाणी आंशिक स्वरूपात पाहता येणार आहे. सेंट हेलेना, नामिबिया, लेसेथो, साऊथ आफ्रिका, साऊथ जॉर्जिया, सॅन्डव्हिच आयलंड, फाल्कलॅन्ड, चिली, न्युझिलंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये सूर्यग्रहण पाहता येणार आहे. पण सूर्यग्रहण कधीच थेट डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी विशिष्ट गॉगल्स वापरणं आवश्यक आहे.
कुठे आणि कधी, कसं पहाल ग्रहण?
सूर्यग्रहण ऑनलाईन पाहण्यासाठी nasa.gov/live ला भेट देऊ शकता किंवा युट्युब वर देखील त्याचं ऑनलाईन स्ट्रिमिंग दाखवले जाते. लाईव्ह स्ट्रिमिंग हे 1:30 am EST म्हणजेच भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजल्यापासून पाहता येणार आहे. भारतीयांसाठी ग्र्हण 12.30 पासून सुरू होईल. दुपारी 1 वाजून 3 मिनिटांच्या सुमारास पिक वर असेल तर 1 वाजून 36 मिनिटांनी ते संपणार आहे.
जगात ज्या भागातून सूर्यग्रहण दिसणार नाही तेथे नागरिक ऑनलाईन ग्रहणाची स्थिती पाहू शकतात. क्षणाक्षणाला बदलणारं रूप डोळ्यात साठवून घेऊ शकता. दरम्यान भारतीय संस्कृतीमध्ये ग्रहणाशी निगडीत अनेक समज-गैरसमज आहेत. जर तुम्ही खगोलप्रेमी असाल तर अवकाशातील या अद्भूत नजार्याला ऑनलाईन पहाण्याची का होईना संधी मात्र दवडू नका.