
नासा (NASA) अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) यांचे पृथ्वीवर परतणे पुन्हा एकदा रखडले आहे. गेले 9 महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परत येण्याची खूप आशा होती, मात्र आता याला आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. दोघांना परत आणण्यासाठी प्रक्षेपित होणाऱ्या रॉकेटमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे परतणे पुढे ढकलण्यात आले आहे. नासा आणि स्पेसएक्सचे संयुक्त अभियान असलेले क्रू-10 हे उपग्रह बुधवारी संध्याकाळी 7.48 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार होते. परंतु प्रक्षेपणाच्या आधी आधी तांत्रिक समस्येमुळे ते रद्द करण्यात आले.
रॉकेटच्या हायड्रॉलिक सिस्टीम आणि ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्ममध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला आणि नंतर स्पेसएक्सने बुधवारी क्रू-10 चे प्रक्षेपण थांबवले. या मोहिमेत चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्याचे नियोजन होते, ज्यामुळे आयएसएसवर अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या परतीचा मार्ग मोकळा होणार होता.
अंतराळवीर सुनीता यांच्या परतीसाठी क्रू-10 हे यान महत्त्वाचे आहे, कारण ते क्रू-9 ची जागा घेण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. क्रू-9 मधून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अवकाशात गेले आहेत. नासाने यापूर्वी म्हटले होते की, क्रू-10 अंतराळात सोडल्यानंतरच क्रू-9 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वरून परत येऊ शकेल. नासाच्या मते, आता क्रू-10 चे पुढील प्रक्षेपण 15 अथवा 17 मार्च रोजी होऊ शकते. मात्र, या तारखादेखील निश्चित नाहीत आणि यासाठी हवामानासह इतर घटकांकडे लक्ष देणे आवश्यक असेल. (हेही वाचा: Starlink Satellite Internet Services भारतामध्ये कधी लॉन्च होऊ शकते? पहा प्लॅन्सचे दर ते टाईमलाईन काय असेल याचा अंदाज)
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलाइनर विमानाच्या चाचणी उड्डाणासाठी अंतराळ स्थानकावर गेले होते. त्यांना सुमारे 10 दिवस तिथे राहायचे होते. मात्र, अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर त्यांच्या अंतराळयानात काही समस्या निर्माण झाल्या. यानंतर ते परत येऊ शकले नाहीत. सप्टेंबरमध्ये हे अंतराळयान कोणत्याही क्रूशिवाय पृथ्वीवर परतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांना अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्याचे काम सोपवले आहे.