Space Flight: आज संध्याकाळी 6:30 वाजता Virgin Galactic चे Richard Branson निघणार अंतराळ प्रवासाला; 'या' ठिकाणी पाहू शकला Live Streaming
Richard Branson (Photo Credits: Twitter)

अमेरिकन अंतराळ यान कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकचे (Virgin Galactic) रिचर्ड ब्रॅन्सन (Richard Branson) आपले सहकारी अब्जाधीश उद्योजक जेफ बेझोस यांच्या नऊ दिवस आधी अवकाशात जात आहेत. ब्रॅन्सन यांच्या कंपनीने गुरुवारी सायंकाळी जाहीर केले की, त्यांचे अंतराळ उड्डाण 11 जुलै रोजी होणार असून, संस्थापकासह सहा लोक या उड्डाणाचा भाग असणार आहेत. हे अंतराळयान न्यू मेक्सिको येथून उड्डाण घेईल, ज्यामध्ये सर्व क्रू सदस्य कंपनीचे कर्मचारी असतील. भविष्यातील अंतराळ प्रवास सुरु करण्याचे स्वप्न असलेल्या ब्रॅन्सनसाठी हा फार महत्वाचा प्रवास ठरेल.

कंपनी आपले स्पेसशिप टू स्पेस प्लेन युनिटी लॉन्च करणार आहे, ज्यात सहा लोक असतील. या लोकांमध्ये भारतीय वंशाच्या सिरिशा बांदलाचाही समावेश आहे. स्पेस वॉक बद्दल संपूर्ण टीम खूप उत्साही आहे. ब्रॅन्सन, त्यांचे तीन चालक दल आणि दोन पायलट या ऐतिहासिक उड्डाणाचा भाग असतील. कंपनीचे स्पेसशिप टू सिस्टम आपल्या व्हीएमएस युनिटी स्पेसप्लेनला वेगळे करण्यापूर्वी व्हीएमएस इव्ह नावाच्या मोठ्या विमान वाहकाद्वारे उंचीवर जाईल. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे सहा वाजता सुरू होईल.

आपणदेखील या प्रवासाचे थेट प्रक्षेपण व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या युट्युबवर पाहू शकाल. जर हा प्रवास यशस्वी ठरला तर येणाऱ्या हा प्रवास प्रवाशांसाठी 90 मिनिटांचा असेल, ज्यासाठी कोट्यावधी रुपये आकारले जातील. रिचर्ड ब्रॅन्सन ज्यासाठी हा प्रवास करीत आहेत त्याचा मुख्य उद्देश म्हणजे भविष्यात लोकांना अंतराळ प्रवासावर पाठवणे हा आहे. यापूर्वीही कंपनीने अनेक चाचण्या केल्या आहेत. हे युनिटीचे 22 वे उड्डाण आणि अंतराळातील चौथे प्रक्षेपण असेल. (हेही वाचा: Oldest Water on Earth: बाबो! पृथ्वीवरील सर्वात जुन्या पाण्याचा शोध लागला; जाणून घ्या कशी आहे या 160 कोटी वर्षे जुन्या पाण्याची चव)

दरम्यान, व्हर्जिन गॅलॅक्टिकचे विमान 2014 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या चाचणी दरम्यान क्रॅश झाले होते, ज्यात एका पायलटचा मृत्यू झाला. दुसरीकडे बेझोस या महिन्यात आपल्या न्यू शेफर्ड या अंतराळ यानाच्या माध्यमातून अवकाशात जाणार आहे. इलोन मस्क देखील या शर्यतीत आहेत. त्यांची कंपनी स्पेस एक्स सप्टेंबरमध्ये लोकांना अंतराळात घेऊन जाईल.