मंगळ ग्रह ( फोटो सौजन्य - फेसबुक )

अमेरिकन अंतराळ संस्था नासा (NASA) जगातील सर्वात महागडी वस्तू (Most Expensive Thing) पृथ्वीवर आणणार आहे. नासा मंगळावरील धूळ आणि माती (Martian Dirt) पृथ्वीवर आणणार आहे. जर तसे झाले तर ही गोष्ट जगातील आत्तापर्यंतही सर्वात महागडी गोष्ट ठरेल. ही माती पृथ्वीवर आणल्यानंतर त्याद्वारे बरेच संशोधन केले जाईल. नासाचे हे खूप महागडे मिशन आहे, ज्यासाठी नासा तब्बल 9 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. नासा तीन मोहिमेदरम्यान मंगळावरुन 2 पौंड (सुमारे एक किलो) माती आणेल. मंगळावरील प्राचीन जीवनाच्या खुणा शोधण्यासाठी नासा ही माती पृथ्वीवर आणेल.

एकत्रितपणे, नासाच्या तीन मोहिमांसाठी 9 अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. मंगळावरुन दोन पौंड माती आणण्यासाठी दोन पौंड सोन्याच्या किंमतीपेक्षा सुमारे दोन लाख पट अधिक खर्च येईल. ही माती पृथ्वीवर आली तर ती वैज्ञानिकांसाठी एक मोठी उपलब्धी ठरेल, कारण आतापर्यंत मंगळावर उपस्थित रोव्हरद्वारेच पृष्ठभागाची माहिती गोळा केली जात आहे.

नासाची पहिली मोहीम मंगळाच्या मातीच्या नमुन्यांची तपासणी व संकलन करेल. दुसरी मोहीम हे नमुने संकलित करेल आणि त्यांना मंगळाच्या कक्षामध्ये लाँच करण्यासाठी लाँचरमध्ये पॅक करेल. तिसरे मिशन मंगळाच्या मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणेल. जुलै 2020 मध्ये Perseverance Rover म्हणून पहिले मिशन सुरू करण्यात आले. फेब्रुवारी 2021 मध्ये रोव्हरने ग्रहावर लँडिंग केले. नासाच्या म्हणण्यानुसार मंगळावरील पृष्ठभागाचे नमुने गोळा करण्याचे काम 2023 पर्यंत पूर्ण केले जाईल. परंतु हे पृथ्वीवर परत आणण्यास सुमारे एक दशक लागू शकेल. (हेही वाचा: 10 जून रोजीच्या सूर्यग्रहणावेळी साजरी होणार Shani Jayanti; सूतक नसल्याने दिवसभर करू शकाल शनि देवतेची पूजा)

दरम्यान, सध्या Perseverance Rover जेझेरो क्रेटरजवळ मंगळावरील प्राचीन जीवनाच्या खुणा शोधत आहे. असा विश्वास आहे की, हा खड्डा कोट्यावधी वर्षांपूर्वी गायब झालेल्या प्राचीन तलावाचा भाग होता. पाण्याची उपस्थिती ही जीवाची चिन्हे शोधण्याची उत्तम संधी देते. यामुळे, अशा खड्ड्यांविषयी अधिक माहिती गोळा केली जात आहे. खड्ड्याची योग्य तपासणी करण्यासाठी रोव्हरवर उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे लावण्यात आले आहेत, ज्याची किंमत 20 दशलक्ष डॉलर्स आहे.