या वर्षातील पहिले सूर्यग्रहण (Solar Eclipse 2021) 10 जून रोजी असणार आहे. गेल्या महिन्यात 26 मे रोजी चंद्रग्रहणानंतर अवघ्या 15 दिवसानंतर हे वर्षातील दुसरे ग्रहण असेल. भारतीय दिनदर्शिकेनुसार, 10 जून रोजी सूर्यग्रहण हे ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या दिवशी होईल. मात्र ते देशात दिसणार नाही, त्यामुळे या सूर्यग्रहणावेळी सूतक लागणार नाही. ज्या ठिकाणी ग्रहण दिसते त्याच ठिकाणी सूतक पाळले जाते. खास गोष्ट म्हणजे या दिवशी शनि जयंती (Shani Jayanti 2021) देखील आहेत. हे कंकनाकृतीत सूर्यग्रहण असेल. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते.
भारतीय वेळेनुसार दुपारी 1:42 वाजता ग्रहण सुरू होईल. दुपारी 3:25 वाजता कंकणाचा आरंभ सुरू होईल आणि संध्याकाळी 4:59 पर्यंत ते चालेल. ग्रहणाचा मध्यकाल सायंकाळी 4: 12 वाजता असेल. संध्याकाळी 6.41 वाजता ग्रहण संपेल. कंकन जास्तीत जास्त 3 मिनिटे 48 सेकंद दृश्यमान असेल. हे सूर्यग्रहण ईशान्य अमेरिका, युरोप, उत्तर आशिया आणि उत्तर अटलांटिक महासागरात दिसेल. भारताच्या पूर्वोत्तर भागातील अरूणाचल प्रदेश तसेच लडाख येथे हे सूर्यग्रहण दिसण्याची शक्यता आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणात सूतक असते. सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सूतक सुरू होते. ज्यामध्ये यज्ञ, विधी इत्यादी कोणतीही शुभ कामे केली जात नाहीत तसेच मंदिरांचे दरवाजेही बंद राहतात. मात्र हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्याने यावेळी सूतक असणार नाही. यापूर्वी 26 मे रोजी झालेला चंद्रग्रहण देखील देशात दिसले नव्हते, म्हणून त्यावेळीही सूतक नव्हते.
दरम्यान, सूर्यग्रहणादिवशी सूर्य पुत्र शनि जयंती देखील साजरी केली जाईल. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार सूर्य आणि शनिदेव यांचा परिणाम लोकांच्या जीवनावरही होईल. शनीचा प्रभाव सकारात्मक आणि नकारात्मक मार्गाने लोकांवर होतो. धार्मिक मान्यतानुसार शनिदेव यांचा जन्म ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या दिवशी झाला होता. या दिवशी विधीवत शनिदेवाची पूजा केल्यास शुभ फल मिळते. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव यांना न्यायाची देवता मानले जाते. यंदाच्या ग्रहणावेळी सूतक नसल्याने तुम्ही दिवसभर शनिदेवाची पूजा करू शकता.