अभय अष्टेकर (Photo credit : twitte)

गेल्या चार दशकांपासून गुरुत्वाकर्षण विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञाला मानाच्या आईन्स्टाईन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमेरिकन फिजिकल सोसायटीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती चक्क मराठी असून या व्यक्तीचे नाव आहे अभय अष्टेकर.

अल्बर्ट आईनस्टाईनच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात 1999साली झाली. पुरस्कार विजेत्याला 10 हजार डॉलर रुपयांचे बक्षीस दिले जाते. पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड द कॉसमासचे डिरेक्टर असलेले अभय अष्टेकर यांना हा पुरस्कार सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्समधील विशेष योगदानाबद्दल देण्यात येत आहे.

अष्टेकर यांचा जन्म 5 जुलै 1949 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. पुढे गुरुत्वाकर्षण विषयातील पदवी त्यांनी टेक्सास विद्यापीठातून प्राप्त केली. त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठात अध्यापनाचे काम केले आहे. अष्टेकर यांनी 1974 मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएच.डी प्राप्त केली. त्यांनी फ्रान्स, कॅनडा आणि भारतात महत्वाच्या पदावर काम केले आहे.

‘भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रज्ञांच्या क्षेत्रात केलेल्या संशोधनामध्ये गुरुत्वाकर्षणाचे प्रभुत्व दिसून येत आहे. संशोधनाबाबतीत भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात भारतीय शास्त्रज्ञ उत्कृष्ट कार्य करत आहेत. ते या क्षेत्रात चीनपेक्षा पुढे आहेत.’ असे मत अभय अष्टेकर यांनी व्यक्त केले.